'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून विशाल-पूजाची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:14 PM2024-03-18T15:14:26+5:302024-03-18T15:17:53+5:30
'साधी माणसं' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या दोन नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'येड लागलं प्रेमाचं' असं स्टार प्रवाहवरील या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह ही लोकप्रिय वाहिनी सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'साधी माणसं' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या दोन नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'येड लागलं प्रेमाचं' असं स्टार प्रवाहवरील या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत 'स्वाभिमान' फेम अभिनेत्री पूजा बिरारी आणि 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत असणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये विशाल निकमचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. विशाल या मालिकेत राया ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर पूजा बिरारी मंजिरीच्या भूमिकेत आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या प्रोमोनंतर या मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.
राया या पात्राविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, "स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखील पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो."
एका छोट्या ब्रेकनंतर पूजा बिरारी देखिल मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. "शुटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेले, असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शुटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. याआधीच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम यापुढेही मिळेल याची मला खात्री आहे", अशी भावना पूजा बिरारीने व्यक्त केली. विशाल आणि पूजाबरोबरच या मालिकेत अतिशा नाईक, नीना कुलकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.