"ही भूमिका करायला मला बायकोने..." 'जय शंकर' मालिका संपताच संग्राम समेळ झाला भावुक, म्हणाला,"पावलोपावली महाराज"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:02 AM2023-10-16T10:02:12+5:302023-10-16T10:16:14+5:30
शंकर महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही मालिका अचानक बंद करण्यात आली आहे.
अनेक कलाकार आपल्या वाटेला आलेली भूमिका चोखपणे साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. त्या भूमिकेत फिट बसण्यासाठी अभ्यास करतात. अभिनेता संग्राम समेळनेही योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. नुकतेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपल्यानंतर संग्राम समेळने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
योगयोगेश्वर जय शंकर मालिकेतून शंकर महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता. ही मालिका अचानक बंद झाली आहे. संग्रामने यात साकारलेली शंकर महाराजांची भूमिके प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
सोशल मीडियावर संग्राम समेळने लिहिले, ''…आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं. एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. वैयक्तिक माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती ही भूमिका करणं. शारिरीक आणि मानासिकदृष्ट्या सुद्धा. पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते. पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी डेली सोप घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर ९ महिने खंबीर पणे घर सांभाळलं. माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं. कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून घर सांभाळलं. जेणेकरून मला माझं काम नीट करता यावं. माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. जेणेकरून मला माझ्या कामात १०० टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय.''
दरम्यान संग्रामने नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 'हे मन बावरे'मध्ये संग्राम दिसला होता.