"तू आमच्यात नाहीस हे...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीला मातृशोक, शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:06 AM2024-04-25T10:06:20+5:302024-04-25T10:06:48+5:30
Dhanashri Bhalekar : आईच्या निधनाला ८ दिवस झाल्यानंतर आता अभिनेत्री धनश्री भालेकरने सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' (Navari Mile Hitlerla) या मालिकेत फाल्गुनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री भालेकर (Dhanashree Bhalekar) हिच्या आईचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून धनश्रीची आई आजारी होती. अखेरच्या दिवसांत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल केले होते. आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून तिने तिच्या चाहत्यांना प्रार्थना करण्यासाठी सांगितले होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. आईच्या निधनाला ८ दिवस झाल्यानंतर आता अभिनेत्री धनश्रीने सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
धनश्री भालेकर हिने इंस्टाग्रामवर आईसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना आईच्या निधनाबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, आई... अगं मला तुझी आठवण येते. आज ८ दिवस झाले पण मला अजूनही हे मान्यच करता येत नाहीये की तू आमच्यात नाही आहेस. मला तुझी खूप गरज आहे, खूप एकटी पडले आहे ग मी आई. माझ्याशी बोलायला, शेअर करायला कोणीच नाही, मला हवी आहेस तू, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. तुझं नसणं म्हणजे माझ्यामधला एक भाग वगळल्यासारखे आहे.
तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही आहे...
तिने पुढे म्हटले की, माझ्या आयुष्यातली प्रेरणा हरवली आहे, खूप अपूर्ण वाटते आहे. किती विशिष्ट असतं तुझं सगळं, तुझं परफेक्शन आणि अति स्वच्छता खूप मिस करते मी. मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे, मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू ? असं वाटतंय तू आहेस क्रिकेट मॅच बघताना खूश होशील, सगळ्या मालिकांच्या कथा सांगशील मला घरी आल्यावर. स्वयंपाकघरामध्ये आहेस, येशील माझा आवडता पदार्थ बनवून आणि मी बाहेरुन घरी आल्यावर देशील मला खायला, घराबाहेर पडताना बाय करायला दाराबाहेर आणि खिडकीत येशील. मला खुप आठवण येते आहे गं तुझी, ब्लॅंक झाले आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही आहे...
प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये...
मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझे लक्ष आहे माझ्यावर. मी प्रॉमिस करते आई तुला दिलेले कमिटमेंट्स आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये. खुप खुप प्रेम. लव्ह यू आई, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
धनश्रीने मराठीसह हिंदी मालिकांत देखील काम केले आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तुझेच मी गीत गात आहे, मेरे साई, सोनी भाग रही है, त्रिदेवीयां अशा मालिकांमध्ये ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.