युट्यूबर एल्विश यादवची लखनऊ ED टीम आज करणार चौकशी, रेव्ह पार्टीत विष पुरवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:33 PM2024-09-05T12:33:14+5:302024-09-05T12:38:20+5:30
Elvish Yadav : युट्यूबर एल्विश यादवची ५ सप्टेंबर म्हणजेच आज ईडीची टीम चौकशी करणार आहे. पोलिसांच्या चौकशीत १७ मार्चला एल्विशला पोलिसांनी अटक केली होती. मात्र नंतर त्याला जामिन मिळाला.
रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवल्याच्या प्रकरणी युट्यूबर एल्विश यादव(Elvish Yadav)ची आज म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी ईडीची टीम चौकशी करणार आहे. एल्विशला ईडी लखनऊ ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्याने जबाब नोंदवण्यासाठी येण्यास असमर्थता व्यक्त करत तीन दिवसांचा अवधी मागितला होता, त्यासाठी ईडीने एल्विश यादवला ५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. कोब्रा प्रकरणात ईडीच्या टीमला एल्विश यादवची पुन्हा चौकशी करायची आहे.
ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात एल्विश यादव विरुद्ध लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीआरमधील मोठमोठे हॉटेल, फार्म हाऊस आणि रेव्ह पार्ट्यांना सापाचे विष पुरवले जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र, एल्विश यादवने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस तपासात १७ मार्च रोजी एल्विशला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, नंतर त्याला जामीन मिळाला.
नोएडामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला
भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर ॲनिमल्स संस्थेचे गौरव गुप्ता यांनी नोएडातील सेक्टर ४९ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्या आधारे एल्विश यादव आणि इतर ५ जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ५ जणांना अटक केली. एल्विशवर आरोप करण्यात आले होते की तो गळ्यात साप टाकून व्हिडीओ शूट करायचा आणि सापांची विक्री करायचा. तो सापांचे विष पुरवतो आणि बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या करतो.
पोलिसांनी ६ आरोपींना केली अटक
नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या पाच गारुड्यांना नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. त्यांच्याकडून पाच कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले होते. या आरोपींनी एल्विश यादवला सापाचे विष पुरवल्याचे सांगितले. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशने आता गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.