“ही तर झाडूवाली पण दिसणार नाही”, ऑडिशनदरम्यान उर्मिला निंबाळकरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली, "माझ्या तोंडावर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 05:01 PM2023-09-05T17:01:56+5:302023-09-05T17:03:59+5:30
"मालिकेतून काढून टाकल्यानंतर ते माझे पैसेही देत नव्हते", उर्मिला निंबाळकरने शेअर केला अनुभव
उर्मिला निंबाळकरने इन्फ्लुएन्सरच्या जगात पाऊल टाकत युट्यूबर होत लोकप्रियता मिळवली. उर्मिला मेकअप, फॅशनवर अनेक व्हिडिओ बनवते. नुकतंच तिने युट्यूबवर १ मिलियनचा टप्पा गाठला आहे. पण, प्रसिद्ध युट्यूबर होण्याचा उर्मिलाचा प्रवास सोपा नव्हता. उर्मिला युट्यूबर होण्याआधी एक मराठी अभिनेत्री होती. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्री ते युट्यूबर होण्याचा प्रवास उर्मिलाने व्हिडिओतून सांगितला आहे. मनोरंजनविश्वात काम करत असताना उर्मिलाने तिला आलेल्या वाईट अनुभवांबद्दलही या व्हिडिओतून भाष्य केलं आहे.
उर्मिलाला एका गाजलेल्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. याबाबत पहिल्यांदाच उर्मिलाने व्हिडिओतून उघडपणे भाष्य केलं. मालिकेतून काढल्यानंतर उर्मिलाला तिच्या कामाचे पैसेही थकवण्यात आले होते. “मालिका सोडल्यानंतरही मला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडता येत नव्हतं. ते मला माझे पैसेच देत नव्हते. मला धूळ मातीत बाहेर बसवून ठेवलं जायचं. माझेच पैसे मागायला मला उभं करुन ठेवलं जायचं,” असं उर्मिलाने सांगितलं. या व्हिडिओमध्ये उर्मिलाने तिला ऑडिशनदरम्यान आलेला अनुभवही सांगितला.
'मी मालिका सोडली नाही, मला काढून टाकलं होतं'; मराठी मालिकेविषयी उर्मिला निंबाळकरचा खुलासा
“ही तर झाडूवाली पण दिसणार नाही, असं ऑडिशनला गेल्यानंतर माझ्या तोंडावर लोक म्हणायचे. मी आता सहानभुतीसाठी हे सगळं बोलत नाहीये. पण, माझ्यासारख्या अशा कित्येक मुलींची स्वप्न मुंबईत रोज तुटतात. माझ्याकडे चांगलं कुटुंब आहे. पण, बाकीच्यांचं का होत असेल. या सगळ्यानंतर कुठेतरी लपून बसावं, असं मला वाटत होतं. आपली लायकी नाही. आपण बीए केलंय, चांगलं इंग्लिशही बोलता येत नाही, त्यामुळे कोणी रिसेप्शनिस्ट म्हणूनही घेणार नाही,” असं उर्मिला म्हणाली.
उर्मिलाने तिच्या कलाविश्वातील अनुभवाबरोबरच युट्यूबर होण्याचा प्रवासही या व्हिडिओत सांगितला. तिच्या या प्रवासात तिचा पती सुक्रितने मोलाची साथ दिली. मालिकेतून बाहेर काढल्यानंतर उर्मिला नैराश्यात गेली होती. याबाबतही उर्मिलाने या व्हिडिओत भाष्य केलं आहे.