लोक मला बायल्या म्हणून चिडवायचे... ; सांगताना गंगाला आवरले नाहीत अश्रू, जाणून घ्या कोण आहे गंगा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:54 AM2020-01-21T10:54:12+5:302020-01-21T12:35:20+5:30
‘युवा डान्सिंग क्वीन’ च्या निमित्ताने सध्या एक नाव सगळ्यांच्या ओठांवर आहे. ते म्हणजे, गंगा. होय, गंगाच्या नृत्याने, तिच्या अदांनी रसिकांना वेड लावले आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, गंगा एक ट्रान्सजेंटर आहे.
झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा सध्या स्पर्धकांच्या नृत्याविष्काराने गाजते आहे. युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये सौंदर्यवतींचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. मात्र या शोमधील एक व्यक्ती सगळ्यांचे लक्ष वेधते, ती म्हणजे गंगा. तुम्हाला ठाऊक असेलच की, गंगा एक ट्रान्सजेंडर आहे. तिचे खरे नाव प्रणित हाटे. गंगा एक ट्रान्सजेंडर असून तिचे याआधीचे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हाच प्रणित आता गंगा म्हणून समोर आला आहे. युवा डान्सिंग क्विनच्या मंचाने गंगाला सगळ्यांसमोर येण्याची संधी दिली आहे.
‘युवा डान्सिंग क्वीन’ मुळे गंगा आज घराघरात पोहोचली. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास खचितच सोपा नव्हता. ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर गंगाने तिच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आणि सगळ्यांचेच डोळे पाणावले. होय, लहानपणापासून वाट्याला आलेली हेटाळणी, अपमान गिळून गंगा इथवर पोहोचली. भूतकाळ आठवताना गंगा भावूक झाली.
‘हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला म्हणून घरात आनंद होता. पण हाटे कुटुंबात मुलगा जन्माला आला असला तरी तो एका मुलीचा आत्मा घेऊन जन्माला आला होता, हे तेव्हा कुणालाही ठाऊक नव्हते. माझ्यातील स्त्रित्वाची भावना मला अवस्थ करत होती. वाढत्या वयासोबत ही भावना आणखी प्रखर होत गेली. हळूहळू जगाच्या डोळ्यातही भरली आणि तशी माझी हेटाळणी सुरु झाली. बाहेर मुलांमध्ये खेळायला जायचे तेव्हा हा बायल्या आहे असे म्हणून सगळे माझी खिल्ली उडवायचे. माझ्यासोबत मैत्रीच काय पण बोलायलाही लोक कचरायचे. टॉयलेटला जायचे असायचे तेव्हा मला क्लास सुरु असतानाच जावे लागायचे. क्लास सुरु असताना टॉयलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन हात वर यायचे. ते विद्यार्थी माझ्या मागे यायचे. माझी टर उडवायचे. हा अपमान, ते टोमणे सहन करणे प्रचंड तणावाचे होते. कारण माझ्यासोबत हे काय सुरु आहे, हेच मला कळत नव्हते. आपण जे काही आहोत, त्यामुळे आपल्याला बायल्या ठरवले जातेय, इतकेच त्यावेळी कळत होते.’ असे गंगा म्हणाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
तू साडी नेसून मिरवण्याच्या लायकीची तेवढी आहे, असे लोक मला तोंडावर म्हणायचे. त्याच लोकांना मी आज सांगू इच्छिते की, हो मी साडी नेसण्यास तयार आहे. कारण माझ्यात तितकी हिंमत आहे. प्रणित ते गंगा या प्रवासात माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला. पण आजही माझ्यासारख्या अनेकांना आधाराची गरज आहे, असेही ती म्हणाली.