'लक्ष्मी निवास' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वपूर्ण भूमिकेत, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:04 IST2025-01-05T11:02:44+5:302025-01-05T11:04:28+5:30
झी मराठी वाहिनीवर अगदी काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'लक्ष्मी निवास' या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

'लक्ष्मी निवास' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वपूर्ण भूमिकेत, पाहा प्रोमो
Lakshmi Niwas New Promo: झी मराठी वाहिनीवर अगदी काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas) या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे. या महामालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर तसेच तुषार दळवी, अक्षया देवधर यांच्यासह दिव्या पुगावकर, निखिल राजेशिर्के आणि मिनाक्षी राठोड अशी तगडी स्टारकास्ट मालिकेत आहे. आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकांच स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लक्ष्मी आणि निवास यांची कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. दरम्यान, आता 'लक्ष्मी निवास'मध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने 'लक्ष्मी निवास' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लक्ष्मी आणि निवास यांची धाकटी मुलगी म्हणजे जान्हवीच्या कॉलेजमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. दरम्यान, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलंय. परंतु जेव्हा जान्हवी कॉलेजमध्ये जाते त्यावेळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्या प्रमुख पाहुण्याला कॉलेजमध्ये आमंत्रित केलं गेलं आहे त्यांचा कटआउट लावलेला दिसतो. पण, हा कटआउट व्यवस्थितरित्या लावलेला नसल्यामुळे या चिफ गेस्टचा चेहरा ती पाहू शकत नाही. त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहूणा म्हणून कोण येईल याचा अंदाज ती लावते.
पुढे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, जान्हवी या प्रमुख पाहुण्याचं परिचयपत्र वाचून पाहते. तरीही तिला काहीच कल्पना येत नाही. त्यावेळी अचानक तिच्या मागून काळ्या रंगाच्या कारमधून एक माणूस बाहेर येतो, आणि तिला आवाज देतो. त्यानंतर जान्हवीची या प्रमुख पाहूण्यासोबत पहिली भेट होते. जान्हवीच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आलेला हा माणूस म्हणजे अभिनेता मेघन जाधव आहे. या मालिकेत मेघन जाधव जयंत नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पाहुणा म्हणून आलेला जयंत जान्हवीच्या आयुष्यात खास स्थान बनवेल का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
मेघन जाधवने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेतही तो झळकला.