‘मन उडू उडू झालं’ मालिकेत इंद्राच्या मदतीसाठी धावून जाणारा सत्तू नक्की आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 08:00 AM2022-06-27T08:00:00+5:302022-06-27T08:00:01+5:30
Man Udu Udu Zhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रा इतकाच सत्तूही प्रेक्षकांचा आवडता आहे. आज आम्ही याच सत्तूबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
Man Udu Udu Zhala : ‘मन उडू उडू झालं’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. मालिकेत इंद्रा आणि दीपूच्या प्रेमाचं सत्य देशपांडे सरांसमोर आलं आहे आणि आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. सत्तुच्या घरी इंद्रा आणि दीपूचा संसार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. देशपांडे सरांनी इंद्रा व दीपूचं प्रेम मान्य करण्यास नकार दिला आहे आणि दीपूने इंद्रासोबत सुखी संसार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्तू वेळप्रसंगी इंद्राच्या मदतीला धावून आलेला पाहायला मिळाला. मालिकेतला सत्तू अनाथ आहे मात्र त्याला इंद्रा आणि त्याच्या आईने आसरा दिला आहे. इंद्रा व त्याची आई सत्तूला घरातल्या सदस्यासारखं मानतात. पण कार्तिक सानिका त्याचा पदोपदी अपमान करतात. सत्तू हा अपमान गिळून इंद्राच्या पाठीशी उभा राहतो. इंद्रा इतकाच सत्तूही प्रेक्षकांचा आवडता आहे. आज आम्ही याच सत्तूबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
सत्तू ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे विनम्र भाबल (Vinamra Bhabal). विनम्र भाबल हा मूळचा देवगडचा. मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने रंगभूमीवर एकांकिकामधून काम करण्यास सुरुवात केली. एका नाट्यशिबिरातून लेखक दिग्दर्शक असलेल्या संभाजी सावंत यांच्याशी ओळख झाली. त्यांनी विनम्रला ‘डेंगो’ या मालवणी नाटकात छोटीशी भूमिका देऊ केली.
पुढे मंगेश कदम दिग्दर्शित बेईमान या नाटकात झळकण्याची संधी त्याला मिळाली. एकांकिकेतून काम करत असल्याने मंदार देवस्थळी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम सांभाळत होते. त्यांनीच विनम्रला कुठलीही ऑडिशन न घेता ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत मोठी भूमिका दिली. या मालिकेमुळे विनम्रला अमाप लोकप्रियता मिळाली. फुलपाखरू, मोरूची मावशी, स्वीटी सातारकर, रेडू, ये रे येरे पैसा अशा मालिका, नाटक आणि चित्रपटातून विनम्रने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील त्याने साकारलेला सत्तू मात्र प्रेक्षकांना विशेष भावला. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला. विनम्रला पुस्तक वाचनाची अत्यंत आवड आहे. फेसबुकवर त्याने वाचनवेडा हे पेज सुरू केले आहे. त्याच्या नावाने त्याने एक युट्युब चॅनल देखील सुरू केले आहे. या युट्युब चॅनलवर तो वेगवेगळे धमाल किस्से तो शेअर करत असतो.