पहिल्याच दिवशी बंद पडलं नव्या मालिकेचं प्रसारण; लोकांची नाराजी! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:32 AM2024-02-13T10:32:13+5:302024-02-13T10:34:41+5:30
झी मराठीवर नव्यानेच सुरु होणाऱ्या 'शिवा' मालिकेचं प्रसारण पहिल्याच दिवशी बंद पडलं. सविस्तर प्रकरण वाचा (shiva new marathi serial)
झी मराठीवर अनेक नवनवीन मालिका सुरु होत आहेत. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून झी मराठीवर आगामी 'शिवा' मालिकेची खुप चर्चा होती. प्रोमो पासूनच 'शिवा' मालिका पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते. ही मालिका काल म्हणजेच १२ मार्चपासून झी मराठीवर सुरु होणार होती. परंतु पहिल्याच दिवशी 'शिवा' ही नवीन मालिका झी मराठीवर सुरु होऊ शकली नाही. त्यामुळे लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
झालं असं की... 'शिवा' मालिका १२ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता झी मराठीवर टेलिकास्ट होणार होती. पण काही तांत्रिक कारणामुळे 'शिवा' मालिकेचा पहिला भाग टेलिकास्ट होऊ शकला नाही. पहिल्या भागाऐवजी चॅनलकडून मालिकेचे प्रोमो दाखवण्यात आले. याशिवाय नव्यानेच सुरु झालेल्या 'पारु' मालिकेचं पुनःप्रक्षेपण दाखवण्यात आलं. त्यामुळे 'शिवा' मालिका पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या फॅन्सचा चांगलाच हिरमोड झाला.
याविषयी झी मराठीकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट रिलीज झालं नाहीय. तरीही एखाद्या नवीन मालिकेचा एपिसोड पहिल्याच दिवशी टेलिकास्ट झाला नाही, त्यामुळे झी मराठीला लोकांच्या तीव्र नाराजीला सामोरं जावं लागलं. 'शिवा' मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना आज बघायला मिळेल. "या गोष्टीचा मालिकेवर परिणाम होईल", "मालिकेचे आणि चॅनलचे रेटिंग यामुळे उतरतील", अशा प्रतिक्रिया देत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.