सापाला किस करायचा सीन अन् पहिल्याच दिवशी मालिकेला केलं ट्रोल; नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:50 PM2024-02-14T13:50:40+5:302024-02-14T13:51:18+5:30
"असं कुठे असतं का?", व्हीएफएक्स आणि सापाबरोबरच्या 'त्या' सीनमुळे झी मराठीवरील मालिका ट्रोल
झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'शिवा' ही नवीकोरी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके मुख्य भूमिकेत आहेत. मंगळवारी(१३ फेब्रुवारी) या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. पण, पहिल्याच भागानंतर मालिकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 'शिवा' या झी मराठी वाहिनीवरील नव्या कोऱ्या मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
'शिवा' मालिकेतील एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. झी मराठीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत आशुतोष हे पात्र साकारणारा शाल्व सापाबरोबर स्टंट करताना दिसत आहे. मुलीला इंम्प्रेस करण्यासाठी आशुतोष साप पकडतो. त्यानंतर त्याचा मित्र त्याला सापाला किस करायला सांगतो. हा व्हिडिओ पाहून नव्या मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेलाही व्हीएफएक्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. या व्हिडिओवर कमेंट करत "हा नाग तर विरोचकाचा आहे", असं काहींनी म्हटलं आहे. तर एकाने "दुसऱ्या सिरियलमधला रेडिमेड ऑब्जेक्ट उचलला का एडिटिंगसाठी?" अशी कमेंट केली आहे. "असं बकवास असतं का कुठे?", "किती डेंजर नाग आहे...अरे एडिट तरी चांगलं करा", अशा कमेंटही केल्या आहेत. "कोणी लिहिलं आहे", अशी कमेंटही केली आहे.
'शिवा' या मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रसारणही झालं नव्हतं. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. पण काही टेक्निकल कारणांमुळे मालिकेचं प्रसारण रखडलं. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अखेर मंगळवारी १३ फेब्रुवारीला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. पण, त्यानंतर मालिकेला ट्रोल केलं गेलं आहे.