माझ्या नवऱ्याची बायको या कार्यक्रमाची जागा घेतली या कार्यक्रमाने, ठरली टीआरपीत अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:17 PM2018-11-12T17:17:43+5:302018-11-12T17:28:04+5:30
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठी उत्सव नात्याचा पुरस्कार २०१८ या कार्यक्रमाने बाजी मारली आहे.
छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठी उत्सव नात्याचा पुरस्कार २०१८ या कार्यक्रमाने बाजी मारली आहे. हा कार्यक्रम अव्वल ठरला असल्याने गेल्या कित्येक आठवड्यापासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या कार्यक्रमाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार तिसऱ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे तर पाचव्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. चला हवा येऊ द्या ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून पहिल्या पाच मध्ये होती. पण गेल्या दोन आठवड्यांपासून या मालिकेला आपले स्थान पहिल्या पाचमध्ये टिकवता आलेले नाही. विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत.