Thank God Movie Review : पास की फेल ? अजय देवगणचा 'थँक गॉड' चित्रपट पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:49 PM2022-10-27T17:49:05+5:302022-10-27T17:51:14+5:30

Thank God Movie Review : जाणून घ्या कसा आहे, अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंगचा 'थँक गॉड' चित्रपट

Thank God Movie Review: Pass or Fail? Read this review before watching Ajay Devgn's 'Thank God' | Thank God Movie Review : पास की फेल ? अजय देवगणचा 'थँक गॉड' चित्रपट पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Thank God Movie Review : पास की फेल ? अजय देवगणचा 'थँक गॉड' चित्रपट पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंग, उर्मिला कोठारे, कियारा खन्ना, महेश बलराज, सौंदर्या शर्मा, नोरा फतेही
दिग्दर्शक : इंद्र कुमार
निर्माते : भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकेरीया, सुनील खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडीत, मकरंद अधिकारी
शैली : फँटसी कॅामेडी ड्रामा
कालावधी : दोन तास एक मिनिट
स्टार - तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

'पुनरपि जननं पुनरपि मरणं...' या संस्कृतीला मानणाऱ्या हिंदू धर्मामध्ये जन्म-मृत्यूसोबतच पाप-पुण्य याला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. याच पाप-पुण्याच्या फेऱ्यात अडकलेल्या मानवाची कथा यात फँटसीच्या सहाय्यानं मांडली आहे. आजच्या गेम शोच्या जमान्यात आणि ५जीच्या युगात इंद्र कुमार यांनी प्रेक्षकांना समजेल अशा वर्तमान शैलीत कथा सादर केली आहे. यासाठी चंद्रगुप्तांपासून यमदूत आणि अप्सरांनाही पारंपरीक वेशभूषेच्या बंधनातून मुक्त करत पाप-पुण्याचा हिशेब मांडणारा गेम शो मांडला आहे.

कथानक : आर्यन कपूर नावाच्या तरुणाची ही कथा आहे. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या आर्यनला नोटाबंदीचा फटका बसतो आणि कर्ज फेडण्यासाठी बंगला विकण्याची वेळ त्याच्यावर येते. आर्यनची पत्नी रुही पोलिस अधिकारी आहे. मुलगी पिहूच्या वाढदिवसाच्याच दिवशी सिद्धार्थतचा अपघात होतो आणि जन्म-मृत्यूच्या मधल्या फेजमध्ये अडकलेल्या सिद्धार्थला यमदूत चंद्रगुप्ताच्या दरबारात हजर करतो. त्यानंतर आर्यनच्या पाप-पुण्याचा हिशेब मांडणारा गेम शो सुरू होतो. चंद्रगुप्त या गेम शोमध्ये आर्यनच्या उणीवांवर आघात करतात. चुकीचं वागल्यास पाप म्हणजे ब्लॅक बॉल्स आणि बरोबर वागल्यास पुण्य म्हणजे व्हाईट बॉल्स अशी कॉन्सेप्ट असते. आर्यन हा गेम शो कसा खेळतो त्याचं चित्रण सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : एका चांगल्या संकल्पनेवर आधारलेला हा सिनेमा काळानुरुप बदल करून तयार करण्यात आला आहे. हे बदल का केले गेलेत याचं स्पष्टीकरणही सिनेमात आहे. जास्त लॉजिक न लावता थोडं डोकं बाजूला ठेवून पाहिल्यास या चित्रपटात जीवनाचं तत्त्वज्ञान आणि शिकवणही मिळू शकते. उगाच फापटपसारा न करता चित्रपटाची लांबी आटोक्यात ठेवण्यात आली आहे. आपण जे कर्म करतो त्याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होत असतो त्याची झलकच यात पहायला मिळते. हा चित्रपट काही ठिकाणी हसवतो, तर काही ठिकाणी अंतर्मुखही करतो. चंद्रगुप्ताचा दरबार आणि त्यातील ऑडीयन्सच्या बसण्याची रचना चांगली करण्यात आली आहे. गेम शोमधील लाईफलाईन्स आणि पाप-पुण्याच्या मोजमापाची संकल्पनाही नावीन्यपूर्ण आहे. वास्तवात असं काही घडत असेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्यानं हे काल्पनिक कथानक आहे. चित्रपट पाहताना काही प्रश्न पडतात, पण त्यांची उत्तरं नंतर मिळतात. कॅास्च्युमपासून व्हीएफएक्सपर्यंत सर्वच गोष्टी चांगल्या आहेत. कॅमेरावर्कही चांगलं आहे.

अभिनय : या चित्रपटावर अजय देवगणची पकड असल्याची जाणवतं आणि अखेरपर्यंत त्यानं ती सैल पडू दिलेली नाही. सिद्धार्थ मल्होत्रानं साकारलेला आर्यन जबाबदाऱ्यांचं भान राखून कर्म करण्याची आवश्यकता असल्याचं शिकवतो. रकुलनं साकारलेली त्याची पत्नी सर्व समस्या अॅक्शननं किंवा टेन्शन घेऊन सुटणाऱ्या नसल्याचं सांगते. उर्मिला कोठारेनं रंगवलेली नायकाची बहिण खूप छान झाली आहे. बऱ्याच दिवसांनी कंवलजीत सिंग यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहणं सुखावह वाटतं. नोरा फतेहीनं ग्लॅमडॅालची भूमिका बजावली आहे. इतर सर्वंनीच लहान-सहान भूमिकांमध्येही चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : संकल्पना, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, व्हिएफएक्स, सादरीकरण
नकारात्मक बाजू : लॉजिकचा विचार नाही, वास्तवदर्शी चित्रपटांचे चाहते निराश होतील
थोडक्यात : इंद्र कुमार यांनी एक जुनाच डाव आजच्या स्टाईलमध्ये सादर केला आहे. जीवनाचं सार आणि गेम शो यांची सांगड घातलेला हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही.

Web Title: Thank God Movie Review: Pass or Fail? Read this review before watching Ajay Devgn's 'Thank God'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.