खोलीचा दरवाजा तोडला अन्...; कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:17 AM2023-08-03T09:17:46+5:302023-08-03T09:19:14+5:30
एका आगामी प्रकल्पावर काम करण्यासाठी देसाई एनडी स्टुडिओत मंगळवारी रात्री आले होते. बुधवारी सकाळपासून त्यांचे सहकारी त्यांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.
मुंबई : आपल्या सिद्धहस्त स्पर्शाने ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘कौन बनेगा करोडपती’ यासह असंख्य चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण स्थळे उजळवून टाकणारे प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली.
एका आगामी प्रकल्पावर काम करण्यासाठी देसाई एनडी स्टुडिओत मंगळवारी रात्री आले होते. बुधवारी सकाळपासून त्यांचे सहकारी त्यांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. सकाळी नऊपर्यंत त्यांच्या खोलीचा दरवाजा बंदच होता. अखेरीस स्टुडिओच्या व्यवस्थापकाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी देसाई यांच्या खोलीचा दरवाजा तोडला असता देसाईंचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह लोंबकळत असल्याचे आढळले.
सर्व बाजू तपासणार -
नितीन देसाई यांंचा मृतदेह नऊच्या सुमारास दोरीला लटकल्याच्या स्वरूपात आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीसह सर्व बाजू तपासण्यात येत आहेत.
- सोमनाथ घार्गे (पोलिस अधीक्षक, रायगड)
नेहमी हसतमुख असणारे...
मी या बातमीवर विश्वास ठेवू शकत नाही. नितीन देसाई यांनी केलेले काम सर्वोत्कृष्ट होते. आम्ही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांच्या नेहमी हसतमुख स्वभावामुळे सेटवरील काम सोपे व्हायचे. तुमची कायम आठवण येत राहील.
- संजय गुप्ता, दिग्दर्शक
नितीनसरांबद्दल ऐकून खूप दु:ख झाले. त्यांचं अतुलनीय कार्य, चातुर्य आणि कलात्मकता कायम स्मरणात राहील.
- परीणिती चोप्रा, अभिनेत्री
धक्कादायकपेक्षाही अतिशय भयानक बातमी! शब्दांत व्यक्त न करता येण्याजोगे दु:ख झाले आहे. ओम शांती.
- कंगना रणौत, अभिनेत्री
देसाईंच्या निधनाची ही भयानक बातमी स्वीकारणे कठीण आहे. २००९ मध्ये ‘जेल’ चित्रपटानिमित्ताने त्यांच्यासोबत काम करण्याचा योग जुळून आला होता. ते अलौकिक होते. तल्लख बुद्धिमत्ता असलेला एक द्रष्टा कलाकार होते. देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. ओम शांती.
- नील नितीन मुकेश, अभिनेता
नितीनदादा असं काही टोकाचं पाऊल उचलेल असं कधीच वाटलं नव्हतं. आपल्या कला दिग्दर्शनाने सुरेख रंग भरणारा आमचा मित्र स्वत:चं चित्र का बेरंग करून गेला, याचं उत्तर सापडत नाही.
- सुबोध भावे, अभिनेता-दिग्दर्शक
दादांनी असं काही केलं असेल यावर विश्वास बसत नाही. २००८ पासून मी त्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांच्याकडे फायटिंग स्पिरीट असल्याने आदर्श म्हणून मी त्यांना बघत आलो. त्यांनी असे का केले, हे आकलनापलीकडले आहे.
- डॅा. अमोल कोल्हे, खासदार, अभिनेते
दमदार आणि खमका माणूस असूनही त्यांना आत्महत्येसारखे पाऊल का उचलावेसे वाटले हे कोडे सुटत नाही. मेंटल हेल्थ किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवत आहे. आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. - जितेंद्र जोशी, अभिनेता
‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटाच्या निमित्ताने नितीन देसाईंची भेट झाली. विलक्षण कलाकार, चित्रपट क्षेत्रावर (व्हिजुअलाइजेशन) भन्नाट हुकूमत असणारा माणूस होता. माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही मला त्यांना दादा म्हणायला आवडायचे. तुमच्यासारख्या दादा माणसाने तरी असे करायला नको होते.
- प्रमोद पवार, अभिनेते-दिग्दर्शक
नितीन देसाईंविषयी ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे. एक दिग्गज प्रॉडक्शन डिझायनर ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. मी त्यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होतो. मृदुभाषी, नम्र, महत्त्वाकांक्षी आणि द्रष्टा माणूस. माझ्या मित्रा तुझी आठवण येईल.
- रितेश देशमुख (अभिनेता)
माझे जिवलग मित्र नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:खी झालो आहे. एक दिग्गज व दूरदर्शी प्रॉडक्शन डिझायनर, ज्याने एनडी स्टुडिओ बनविला आहे. नितीनवर फक्त पल्लवी आणि मीच प्रेम केले नाही तर आम्ही एकत्र न केलेल्या चित्रपटांमध्येही त्याने मला नेहमीच मार्गदर्शन केले. का नितीन, का?
- विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक
नितीन देसाईंबद्दल ऐकून धक्का बसला आहे. शब्दच नाहीत. (कर्जत येथील एनडी स्टुडिओच्या वाटेवर असताना गोवारीकरांनी हे ट्विट केले व लगेच एनडीमध्ये पोहोचले.)
- आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक
नितीनदादांचे अकाली जाणे धक्कादायक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील भव्य-दिव्य स्वप्न पाहणारे महान कलादिग्दर्शक आणि सामान्य कुटुंबातून येऊन जागतिक दर्जाचा सिने स्टुडिओ उभारणारे एक असामान्य मराठी उद्योजक असणारे दादा जेवढे कणखर होते तेवढेच हळवेही होते. - रवी जाधव, दिग्दर्शक
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकली; पण त्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या अफाट प्रतिभा आणि बहिर्मुख व्यक्तिमत्वामुळे प्रत्येक चित्रपट अविस्मरणीय बनला. भारतीय चित्रपटसृष्टीने एक खरे रत्न गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण संवेदना. - मधुर भांडारकर, दिग्दर्शक