प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने इरफान खानवरुन ठेवलं लेकीचं नाव; कारण सांगत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:41 PM2023-08-29T13:41:49+5:302023-08-29T13:41:49+5:30
Marathi actor: या व्हिडीओमध्ये एका मराठी कलाकाराने त्याच्या लेकीचं नाव इरफान खानच्या नावावरुन ठेवल्याचं सांगितलं आहे.
कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करायचं असेल तर त्यासाठी केवळ रंगरुप गरजेचं नाही तर टॅलेंट महत्त्वाचं आहे हे सिद्ध करुन दाखवलं ते अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याने. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या इरफानचं निधन होऊन आज अडीच-तीन वर्ष उलटली. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. इरफानच्या अभिनयाचे आज असंख्य चाहते पाहायला मिळतात. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे एक लोकप्रिय मराठी अभिनेता इरफान खानचा प्रचंड मोठा चाहता असून त्याने त्याच्या लेकीचं नाव इरफानवरुनच ठेवलं आहे.
राजश्री मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका मराठी कलाकाराने त्याच्या लेकीचं नाव इरफान खानच्या नावावरुन ठेवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"पठाणाच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आलाय"; 'या' गोष्टीमुळे इरफानची उडवली जायची खिल्ली
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला दौलत अर्थात अभिनेता ऋषिकेश शेलार साऱ्यांनाच ठावूक आहे. सध्या ऋषिकेश 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अधिपती ही भूमिका साकारत आहे. तर, या अधिपतीने म्हणजेच ऋषिकेशने त्याच्या लेकीचं नाव इरफान खानच्या नावावरुन ठेवलं आहे. लेकीचं नाव इरफानवरुन ठेवण्यामागचं कारणही त्याने यावेळी सांगितलं आहे. ऋषिकेशने 'राजश्री मराठी'च्या 'त्याची गोष्ट' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनेता इरफान खानला याला फोन लावला. आणि, त्याच्या मनातील अनेक गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्या.
काय म्हणाला ऋषिकेश?
'नमस्कार, इरफान कसा आहेस माझ्या भावा?' माझ्यासारख्या असंख्य अभिनेत्यांना तू मोठ्या भावासारखा आहेस. तू फार लवकर गेलास पण, आमच्यामध्ये आजही तू आहेस…आमच्या सगळ्यांमध्ये आज एक-एक इरफान आहे आणि हीच तुझी खरी ताकद आहे. तू जयपूरचा अन् कोण कुठला मी सांगलीचा एक मुलगा…तू गेल्यानंतर खूप रडलो. माझ्यासारखे असंख्य लोक त्यादिवशी रडले असतील. इरफान तू कॅमेराचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवून दिलास म्हणून ग्रेट आहेस. तू दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणं हे आता सोपं वाटतंय पण, ज्या पद्धतीचं काम तू केलंस त्याची तुलना केलीच जाऊ शकत नाही. तुझ्यासारखं काम करणं खरंच फार अवघड आहे. स्वत:वरचा विश्वास ढळू न देता तू वेगळं काम करत राहिलास आणि आज लोक बोलतात इरफान खान साहेबांसारखं काम करा…ही खरचं किती मोठी गोष्ट आहे,' असं ऋषिकेश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, 'या जन्मात आपली भेट होऊ शकली नाही ही खंत माझ्या मनात कायम राहिल! तू नेहमी म्हणतोस ना, ‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा, किसी चिराग़ का अपना मकाँ नहीं होता’ तू तिथेही सर्वांना प्रकाश देत असशील. तुझ्या नावावरून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलंय, त्यामुळे तिच्या डोळ्यात मी जेव्हा-जेव्हा बघेन… तेव्हा मला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. मी कधीच पाट्या टाकणार नाही.' दरम्यान, ऋषिकेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोनवर संभाषण करत असताना ऋषिकेश प्रचंड भावुक झाला होता.