हे फार चुकीचं...;‘The Kashmir Files’मध्ये बिट्टा साकारणारा चिन्मय मांडलेकर का चिडला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:15 PM2022-03-16T13:15:17+5:302022-03-16T13:20:01+5:30

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे.

The Kashmir Files bitta aks chinmay mandlekar reaction on audio mute | हे फार चुकीचं...;‘The Kashmir Files’मध्ये बिट्टा साकारणारा चिन्मय मांडलेकर का चिडला?

हे फार चुकीचं...;‘The Kashmir Files’मध्ये बिट्टा साकारणारा चिन्मय मांडलेकर का चिडला?

googlenewsNext

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files )या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी सोशल मीडियापासून, बॉक्स ऑफिसपर्यंत या आणि याच चित्रपटाची चर्चा आहे. शिवाय काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचं विदारक दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटावरून राजकीय गोटातील वातावरणही तापलेलं पाहायला मिळतंय. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) प्रतिक्रिया दिली आहे.

‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय हा चित्रपट, या चित्रपटात साकारलेली बिट्टाची भूमिका आणि चित्रपटावरून सुरू असलेले वाद यावर बोलला. काही चित्रपटगृहात बिट्टाच्या तोंडचे संवाद म्यूट करुन दाखवण्यात आले आहे, याबद्दलही तो बोलला.


 
हे फार चुकीचं आहे...
 काही चित्रपटगृहात बिट्टाचे ठराविक संवाद म्यूट करून दाखवण्यात येत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे.  हे फार चुकीचं आहे. बिट्टाच्या तोंडचे संवाद हा सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. ते चित्रपटातील एक पात्र आहे. मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील माझ्या तोंडी असलेल्या कुठल्याही संवादाने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, असं मला अजिबात वाटत नाही, असं चिन्मय म्हणाला.

बिट्टासाठी खूप मेहनत घेतली...

‘द काश्मीर फाईल्स’मध्ये बिट्टाची भूमिका साकारण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. पल्लवी जोशीनं या भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं होतं. मी आणि पल्लवी आम्ही चांगले मित्र आहोत. एका मालिकेत आम्ही दोघांनी काम केलं होतं. अर्थात ‘द काश्मीर फाईल्स’साठी अगदी सामान्य कलाकारासारखीच मी सुद्धा स्क्रीन टेस्ट, ऑडिशन वगैरे दिली. त्यांनी मला काही संवाद वाचायला दिले. मी ते ऐकवले आणि माझी या भूमिकेसाठी निवड झाली.  बिट्टाचं कॅरेक्टर रंगवण्यासाठी लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खूप साहित्य उपलब्ध करुन दिलं. त्याची मदत झाली. बिट्टासारखी भूमिका अद्याप मिळाली नव्हती. त्यामुळे काश्मिरी अतिरेक्याची ही भूमिका निभावण्यासाठी मला खूप तयारी करावी लागली. यासाठी मी काही व्हिडीओ पाहिले.   बिट्टाचे काही जुने व्हिडीओही मला मिळाले. मी ते वारंवार पाहत होतो,  असं चिन्मय म्हणाला.  या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी फार खूश आहे. आम्ही सगळ्यांनीच घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे, असं मला वाटतं, असंही तो म्हणाला.  

Web Title: The Kashmir Files bitta aks chinmay mandlekar reaction on audio mute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.