"हा एक अत्याचार असून..."; रेल्वे बंद पडल्याने मुंबईकर हैराण झाल्याने विवेक अग्निहोत्रींचा संताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:32 PM2024-07-24T15:32:40+5:302024-07-24T15:33:07+5:30
पावसामुळे लोकल बंद पडल्याने मुंबईकर रेल्वे पटरीवर चालत असल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यावर विवेक अग्निहोत्रींनी संताप व्यक्त केलाय (vivek agnihotri)
आज मुंबईत पुन्हा एकदा लोकलला फटका झाला. माटुंगा स्थानकाजवळील फास्ट ट्रॅकवर बांबू कोसळल्याने लोकल थांबवण्यात आल्या . त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक थांबली. सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या घटनेचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅकवरील बांबू बाजूला करुन लोकल वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु केले. मात्र मुंबईकरांना प्रचंड त्रास झाला. याच घटनेचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्रींनी त्यांचा संताप व्यक्त केलाय.
लोकलचा खोळंबा झाल्याने विवेक अग्निहोत्रींचा संताप
विवेक अग्निहोत्रींनी मुंबईकर रेल्वे पटरीवर चालतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्री म्हणाले, "लोकल ट्रेन सर्व्हिस बंद पडल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर चालावं लागलं. मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचाय, सभ्य देशात नागरिकांवर असा अत्याचार होईल याची कल्पना केली होती?" असा संतप्त सवाल विवेक अग्निहोत्रींनी केलाय. विवेक अग्निहोत्रींनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी त्यांच्या म्हणण्याचं समर्थन केलंय.
Mumbaikars walking on railway tracks to reach their office due to failure of local train service.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 24, 2024
Just ask a simple question: Can you even imagine torture of citizens like this in any civilised country? pic.twitter.com/o1QM0XreM7
लोकल रेल्वे नेमकी का खोळंबली?
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे हद्दीलगतच्या एका इमारतीची बांबूची शेड रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईकरांच्या ऑफिसच्या वेळेस ही घटना घडल्याने कामावर जाणाऱ्यांना मोठा फटका बसला. बराच वेळ फास्ट लोकल एकाच ठिकाणी थांबल्यामुळे शेकडो प्रवाशांना खाली उतरून रेल्वे ट्रॅकवरुन चालत स्टेशन गाठावं लागलं. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागलं.