पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होऊ देणार नाही; मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:18 PM2022-12-09T19:18:14+5:302022-12-09T19:18:56+5:30
पाकिस्तानातील सर्वात मोठा चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.
The Legend Of Maula Jatt India Release: फवाद खान, माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांचा 'द लीजेंड ऑफ मौला जट' पाकिस्तानातील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. चित्रपटाने पाकिस्तानी चलनानुसार 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 200 कोटींचा व्यवसाय केलाय. चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता हा चित्रपट भारतात रिलीज करण्याचा विचार केला जात आहे.
मनसे आक्रमक
'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होत असल्याची माहिती समोर येताच देशात राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमेय खोपकर यांनी 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शनाबाबत नाराजी व्यक्त केली.
There are plans to release Pakistani actor Fawad Khan’s Pakistani film ‘ The Legend of Maula Jatt’ in India. It is most infuriating that an Indian company is leading this plan. Following Raj Saheb’s orders we will not let this film release anywhere in India.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 9, 2022
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज करण्याची योजना आखली जात आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे एक भारतीय कंपनी या योजनेत आहे, परंतु राज साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट भारतात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही."
Fawad Khan’s fans, traitors may very well go to Pakistan and watch the film.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 9, 2022
एवढेच नाही तर अमेय खोपकरांनी आणखी एका ट्विटमध्ये फवाद खानच्या भारतीय चाहत्यांना देशद्रोही ठरवले आहे. तसेच, “फवाद खानचे देशद्रोही चाहते, पाकिस्तानात जाऊन त्याचा चित्रपट पाहू शकतात”, असे म्हटले.
सर्वात मोठा पाकिस्तानी चित्रपट
दरम्यान, 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानमध्ये बनलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाने परदेशातील कमाईच्या बाबतीत सर्व पाकिस्तानी चित्रपटांनाच मागे टाकले नाही तर अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे. 200 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये 80 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर परदेशात या चित्रपटाने 120 कोटींचे कलेक्शन नोंदवले आहे.