'नाद'चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, सिनेमा या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 05:33 PM2024-09-05T17:33:58+5:302024-09-05T17:34:20+5:30

Naad Movie : 'नाद - द हार्ड लव्ह' हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

The music release ceremony of 'Naad' is over, the movie will be released on this day | 'नाद'चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, सिनेमा या दिवशी येणार भेटीला

'नाद'चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न, सिनेमा या दिवशी येणार भेटीला

'नाद - द हार्ड लव्ह' (Naad The Hard Love Movie) हा नवा कोरा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. एका हार्ड लव्हस्टोरीला धडाकेबाज अ‍ॅक्शनचा तडका देताना सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न 'नाद'मध्ये करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची पसंती लाभल्यानंतर यातील सुरेल गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. 'नाद' हा चित्रपट १८ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला. अभिनेत्री शिवाली परब आणि उत्कर्ष शिंदे यांच्या सहजसुंदर सूत्रसंचालनाने नटलेल्या या सोहळ्याला अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याखेरीज चित्रपटातील प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक व निर्मातेही हजर होते.

यावेळी प्रसाद ओक यांनी 'नाद'च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार आहेत. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.

'नाद' चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'डोळ्यांत तूच आहे...' हे विनायक पवार यांनी लिहिलेलं गाणं अभय जोधपूरकर यांनी गायलं आहे. पवार यांनीच लिहिलेलं 'तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे...' हे रोमँटिक साँग आदर्श शिंदे आणि बेला शेंडे यांच्या सुमधूर आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. 'नादखुळा डान्स करा रे...' हे धमाल गीत वैभव देशमुख यांनी लिहिलं असून, आदर्श आणि आनंद शिंदे यांनी गायलं आहे. 'जीवाचे हाल...' हे या चित्रपटातील दुसरं रोमँटिक साँगही विनायक पवार यांच्याच लेखणीतून अवतरलं असून, या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि सायली पंकज या गायकांचे सूर लाभले आहेत. 


छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत कायम विविधांगी व्यक्तिरेखा साकारत रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेला 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचं एक नवं रूप 'नाद'मध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटातील किरणचं अँग्री यंग मॅन शैलीतील रूप प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे. यात किरणच्या जोडीला सपना माने मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे सपना माने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत असून यामधून प्रेक्षकांना किरण-सपनाच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग इ. कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. सिनेमॅटोग्राफी अमित सिंह यांनी, तर कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केलं आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत. आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड, तर संकेत चव्हाण लाइन प्रोड्युसर आहेत.

Web Title: The music release ceremony of 'Naad' is over, the movie will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.