Diwali Pahat : यंदा बजेट वाढूनही दिवाळी पहाटची संख्या भरघोस वाढली

By संजय घावरे | Published: October 23, 2022 05:07 PM2022-10-23T17:07:00+5:302022-10-23T18:00:05+5:30

Diwali Pahat : ८०-९०च्या दशकात दिवाळी पहाटला खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. २०००च्या आसपास बदललेले दिवाळी पहाटचे स्वरूप आज सर्वांसमोर आहे...

the number of Diwali pahats has increased despite the increase in budget | Diwali Pahat : यंदा बजेट वाढूनही दिवाळी पहाटची संख्या भरघोस वाढली

Diwali Pahat : यंदा बजेट वाढूनही दिवाळी पहाटची संख्या भरघोस वाढली

googlenewsNext

Diwali Pahat : दिवाळी आली की फराळ, नवीन कपडे, फटाक्यांच्या खरेदीप्रमाणेच दिवाळी पहाटचेही वेध लागतात. उगवत्या सूर्याच्या साक्षीने गल्लोगल्ली साजरी होणारी दिवाळी पहाट आज परदेशांतही मराठमोळ्या सणांचे रंग उधळत आहे. काळानुरूप कार्यक्रमाचे स्वरूप बदलले असले तरी मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा विचार मनामनांत रुजला आहे. त्यामुळेच बजेट वाढूनही दिवाळी पहाटची संख्याही भरघोस वाढली आहे.

चतुरंग प्रतिष्ठानच्या विद्याधर निमकर यांनी १९८६मध्ये दिवाळी पहाट या संकल्पनेअंतर्गत अभ्यंगस्नानानंतर सकाळच्या वेळी गीतांच्या सुरेल सांगीतिक मैफीलीची सुरुवात केली. त्या मैफिलीत अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायन केले होते. शिवाजी मंदीरमध्ये पहाटे ‘वहातो ही दुर्वांची जुडी’ हा कार्यक्रम सादर करत बाळ कोल्हटकरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. हिच ‘दिवाळी पहाट’ची सुरुवात मानली जाते.

दादरमध्ये सुरू झालेली दिवाळी पहाटची परंपरा पुढे प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर, ठाण्यातील गडकरी रंगायतनपर्यंत पोहोचली. आज मुंबई, ठाणे, वाशी आणि पुण्यापर्यंत असलेली दिवाळी पहाटची परंपरा महाराष्ट्रभराच्या सीमारेषा ओलांडून परदेशातही पोहोचली आहे. दुबई, आबुधाबी, शारजा, लंडन, कॅनडा, युएसमध्येही दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो. आशा खाडीलकर, प्रभाकर कारेकर, किशोरी आमोणकर, हृदयनाथ मंगेशकर, प्रभा अत्रे, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, शौनक अभिषेकी, अनुप जलोटा, देवकी पंडीत अशा दिग्गजांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यात ह.भ.प. बाबामहाराज सातारकरांची किर्तनेही झाली आहेत. ८०-९०च्या दशकात दिवाळी पहाटला खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. २०००च्या आसपास बदललेले दिवाळी पहाटचे स्वरूप आज सर्वांसमोर आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या दिवाळी पहाटला आज राजकीय वरदहस्त लाभला आहे. बरेच राजकीय पक्ष आणि पुढारी दिवाळी पहाट करत आपापल्या परीने मराठी संस्कृतीचे जतन करण्याचे काम करत आहेत.
.........................
 

पूर्वीचे बजेट - पाच हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत
आजचे बजेट - एक लाखापासून १० लाख रुपयांपर्यंत
गायकांचे मानधन - १० ते १५ हजार रुपये
वादकांचे मानधन - सहा ते आठ हजार रुपये
एकूण खर्च - एक ते दीड लाख रुपयांपर्यंत
...........................

-  जयेंद्र साळगावकर (संचालक - कालनिर्णय)
दिवाळी पहाटमध्ये राजकीयांचा वरचष्मा झाल्यानं एक वेगळा रंग चढला आहे. दिवाळी पहाटद्वारे आपली संस्कृती जपली जाते, पण फक्त गाणी करणं योग्य नसून इतरही बाबी श्रोत्यांना सांगायला हव्यात. बदलत्या दिवाळीचं स्वरूप सांगायला हवं. काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. 
.............................

- मंदार कर्णिक (संचालक - स्वरगंधार)
आज दिवाळी पहाट हा कार्यक्रम जवळपास विनामूल्य आहे. राजकारण्यांनी या कार्यक्रमात रुची दाखवल्यामुळे दिवाळी पहाटची संख्या वाढली आहे. पूर्वी निवडक लोकांना परफॉर्म करायला मिळायचं. आज कार्यक्रमांची संख्या वाढल्यानं कलाकार-तंत्रज्ञांना काम मिळालं आहे. 

 

Web Title: the number of Diwali pahats has increased despite the increase in budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.