मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:07 PM2023-06-20T21:07:16+5:302023-06-20T21:08:40+5:30
प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला.
मुंबई - तगडी स्टारकास्ट आणि बिग बजेट सिनेमा असलेल्या आदिपुरुष चित्रपटाच्या संवाद लेखनावरुन चांगलाच गदारोळ सुरू आहे. या चित्रपटातून हिंदू संस्कृती आणि रामायणाच अवमान करण्यात आल्याचा आरोप होत असून चित्रपटाच्या दिग्दर्शकासह स्टारकास्टलाही ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हिंदू संघटनांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले असून संवादलेखक मनोज मुंतशीर यांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल महाभारत आणि रामायण मालिकेत भूमिका निभावणाऱ्या कलाकारांनीही आक्षेप घेतला आहे. आता, शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी देशातील तरुणाईने आदिपुरुष चित्रपटाला विरोध करायलाच हवा, असे म्हटलंय.
प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर गोंधळ सुरु आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महाभारतात भिष्म पितामह यांची भूमिका निभावणाऱ्या मुकेश खन्ना यांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे. तसेच, तरुणाईने चित्रपटाचा विरोध करायलाच हवा, अन्यता हिंदू जागरुक नाहीत, असेच मी म्हणेन, असेही ते म्हणाले. ''आपण तरुणांना म्हणतोय की अरे रे.. नका विरोध करू. मला वाटतं का विरोध करू नये. आपण हे सर्व देशातील तरुणाईसाठी बनवलंय. माझा यास मोठा आक्षेप आहे. मला वाटतंय, देशातील जनता जर याला थांबवत नसेल तर, आपले १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, असेच मी म्हणेन,'' असे मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.
#WATCH | "If the people of the country don't stop this, then I'll think that 100 crore Hindus have not awakened yet," says actor Mukesh Khanna on the film 'Adipurush'. pic.twitter.com/38Q0F8Oi3n
— ANI (@ANI) June 20, 2023
सोशल मीडियातून व्यक्त केला संताप
''आदिपुरुष’ हा सध्याच्या युगातील सर्वात विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे आपला पवित्र ग्रंथ वाल्मिकी रामायणाचा घोर अपमान आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला परवानगी कशी दिली? प्रेक्षक या लोकांना माफ करतील का? या सगळ्यात महागड्या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग नक्की फ्लॉफ ठरवेल.'', असे मुकेश खन्ना यांनी यापूर्वी म्हटले होते.