'फिर हेरा फेरी' चे दिग्दर्शक नीरज वोरा कोमामध्ये
By Admin | Published: January 13, 2017 12:53 PM2017-01-13T12:53:28+5:302017-01-13T14:47:04+5:30
बॉलिवूडचे अभिनेते-सिनेनिर्माते नीरज वोरा गेल्या दोन महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - बॉलिवूडचे अभिनेते-दिग्दर्शक नीरज वोरा गेल्या दोन महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये दिल्लीत असताना नीरज यांना ब्रेन स्ट्रोक आला. तेव्हापासून त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज वोरा यांना बराच काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत किंचितशी सुधारणा जाणवल्याने गेल्याच आठवड्यात त्यांना सामान्य वॉर्डमध्ये हलवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला. तब्येतीत सुधारणा होत असली तरी अजूनही त्यांच्या प्रकृतीला धोका कायम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
वोरा यांनी 'रंगीला', 'अकेल हम अकेले तुम', 'चोरी चोरी चुपके चुपके' आणि 'हेरा फेरी' या सुपरहिट सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. दरम्यान, नीरज वोरा यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांना मुलबाळ नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतही त्यांचा खास मित्रपरिवार नाही. मुंबईमधीलच मित्र सध्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.
हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावल आणि आमिर खानने नीरज यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीच्या माहितीसाठी दोघंही हॉस्पिटल प्रशासनाच्या संपर्कात आहेत.