कास्टिंग काऊच : आधी मुलीच घोळ घालतात आणि मग ब्लॅकमेल करतात - कृष्णा अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 02:12 PM2018-05-02T14:12:16+5:302018-05-02T14:12:36+5:30
आता अनेक सेलिब्रिटी यावर मोकळेपणाने बोलत आहेत. कॉमेडियन कृष्णा अभिषेकने कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचवरुन जोरदार चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर त्यांनी वक्तव्याबाबत माफीही मागितली होती. आता अनेक सेलिब्रिटी यावर मोकळेपणाने बोलत आहेत. कॉमेडियन कृष्णा अभिषेकने कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
कृष्णा अभिषेक म्हणाला की, 'फिल्स इंटस्ट्रीत कास्टिंग काऊच सारखी कोणतीही गोष्ट नसते. हे सगळं ब्लॅकमेलिंगचं काम आहे. मुली स्व:ता आधी घोळ घालतात आणि नंतर आरोप लावतात'.
कृष्णा म्हणाला की, 'कास्टिंग काऊचबाबत सरोज खान या जे काही बोलल्या ते त्यांचे विचार होते. मला त्यांचं ते मत मान्य नाहीये. तुम्ही एका राजकारण्याकडे बोट दाखवून सर्वांना वाईट म्हणू शकत नाही. आपल्या देशात काही चांगलेही राजकारणी आहेत. आमच्या फिल्म लाईनमध्येही काही चांगले कलाकार आहेत तर काही वाईट. जे चांगलं काम करताहेत ते टिकून आहेत. मला वाटतं कुणा एकाच्या चुकीने सगळ्यांना तसेच बघणे चुकीचे आहे'.
कृष्णा पुढे म्हणाला की, 'कास्टिंग काऊचसारखी काही गोष्ट नसते. हे सगळं ब्लॅकमेल करण्यासारखं काम असतं. फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कमी होतं आणि दुसऱ्या बिझनेसमध्ये अधिक होतं. खासकरुन कॉर्पोरेट क्षेत्रात कास्टिंग काऊच जास्त होतं. सिनेमातील लोकांकडे नेहमी बोट दाखवलं जातं. कारण आम्ही मीडियामध्ये असतो'.
कृष्णा म्हणाला की, 'मुली स्वत:हून काहीतरी घोळ घालतात आणि नंतर ब्लॅकमेल करतात की, त्या व्यक्तीने असं असं केलंय. जर असे असेल तर कास्टिंग काऊच कॉलेजमध्येही होतं. तुम्ही माझ्यासोबत रेक्लेमेशन बांद्रा येथे चला. लाईनमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये माहित नाही काय सुरु असतं. नंतर मुलगी बाहेर येऊन म्हणत असेल की, त्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट केलंय. काय चुकीचं केलंय?, असे तो म्हणाला.