अभिनयक्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 01:40 AM2017-04-24T01:40:51+5:302017-04-24T01:40:51+5:30

श्वेता सिन्हा एका मालिकेत परी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिच्या या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. श्वेताने गेल्या काही वर्षांत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

There is no option without hard work in acting | अभिनयक्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही

अभिनयक्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नाही

googlenewsNext

श्वेता सिन्हा एका मालिकेत परी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिच्या या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. श्वेताने गेल्या काही वर्षांत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

श्वेता तू तुझ्या अभिनय कारकिर्दीला कशाप्रकारे सुरुवात केलीस?
मी फॅशन डिझायनिंग केले आहे. पण मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी सुरुवातीच्या काळात काही हिंदी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर मला अनेक जाहिरातींमध्ये झळकण्याची संधी मिळाली. जाहिरातींमध्ये काम करत असतानाच मी मालिकांसाठी आॅडिशन्स देत होती. मला आॅडिशनमधूनच अनेक मालिकांमध्ये काम करायला मिळाले. परी या व्यक्तिरेखेसाठी मालिकेची टीम एका उंच मुलीच्या शोधात होते. मी आॅडिशन दिल्यावर या भूमिकेसाठी मी योग्य असल्याचे त्यांना वाटले आणि या मालिकेचा माझा प्रवास सुरू झाला. आज गेली अनेक वर्षं मी या मालिकेत काम करत असून प्रेक्षकांना माझी भूमिका खूपच आवडत आहे.

तू आजवर अनेक आॅडिशन्स दिल्या आहेत, आॅडिशन्सच्या अनुभवाविषयी काय सांगशील?

आॅडिशन देणे हे खरेच सोपे नसते. तिथे प्रचंड गर्दी असते. अनेक जण एकाच भूमिकेसाठी आॅडिशन द्यायला आलेले असतात. या सगळ्यात आपले डोके शांत ठेवून आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा असतो. आॅडिशनमध्ये तुमचे लूक्स सर्वात पहिल्यांदा पाहिले जातात. कारण विशिष्ट व्यक्तिरेखेसाठी कसा कलाकार पाहिजे हे प्रोडक्शन टीमच्या पक्के डोक्यात असते. त्यामुळे ते त्याप्रकारे पहिल्यांदा लूकचा विचार करतात. प्रोडक्शन हाऊसने होकार दिल्यानंतर वाहिनीनेदेखील होकार देणे गरजेचे असते. त्यामुळे या गोष्टी प्रेक्षकांना वाटतात, तितक्या खरेच सोप्या नसतात.

परी या व्यक्तिरेखेमुळे तुझ्या आयुष्यात किती बदल घडला आहे?
परी या व्यक्तिरेखेने मला एक वेगळी ओळख मिळून दिली आहे. प्रेक्षक मला भेटल्यावर या व्यक्तिरेखेबाबत माझ्याशी बोलतात, माझे आॅटोग्राफ घेतात, माझ्यासोबत फोटो काढतात. तसेच माझ्याविषयी त्यांच्या मनात एक सन्मान आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच आज मी इतके यश मिळवू शकले आहे. मीदेखील फॅन्सना भेटल्यावर एका सामान्य व्यक्तीसारखी त्यांच्याशी गप्पा-गोष्टी करते. तुम्ही आयुष्यात कितीही प्रगती केली तरी तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत ही गोष्ट मी नेहमीच लक्षात ठेवते.

इडंस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्थिरावणे किती कठीण आहे असे तुला वाटते?
इंडस्ट्रीमध्ये तुमचा कोणी गॉडफादर असो अथवा नसो तुम्हाला मेहनत ही करायचीच आहे. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणे हे अशक्य आहे. गॉडफादर असल्यास इंडस्ट्रीत प्रवेश करणे तुमच्यासाठी सोपे जाते. पण त्यानंतर तुमच्या अभिनयाच्या जोरावरच तुम्हाला तुमचे एक प्रस्थ निर्माण करायचे असते. तुमचे यश, अपयश हे सर्वस्व प्रेक्षकांवर अवलंबून असते. त्यामुळे ज्यांचे गॉडफादर आहेत त्यांनादेखील या इंडस्ट्रीत स्ट्रगल हा करावा लागतोच. केवळ गॉडफादर नसलेल्या आमच्यासारख्या कलाकारांना इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते.

Web Title: There is no option without hard work in acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.