'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेच्या यशामागे आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:36 AM2022-06-30T10:36:28+5:302022-06-30T10:37:20+5:30
Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable: निलेश साबळेचा आज वाढदिवस असून या निमित्ताने जाणून घेऊयात चला हवा येऊ द्या शो सुरू होण्यामागचा इंटरेस्टिंग किस्सा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) सर्वांनाच आवडता आहे. फक्त लोकांमध्येच नाही तर सेलिब्रेटींमध्येही हा शो प्रसिद्ध आहे. या शोच्या मंचावर फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनीच नाही तर बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमधील सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोची सूत्र ताकदीने हाताळणारा अभिनेता, सूत्रसंचालक, विनोदवीर आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळेचा (Dr. Nilesh Sable Birthday) ३० जून रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याचा इंटरेस्टिंग किस्सा आज जाणून घेऊयात.
झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या शो २०१४ साली प्रसारित झाला आणि पहिलाच एपिसोड निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या भन्नाट स्क्रीप्टने गाजला. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची सुरुवात होण्यामागे कुणाचा हात आहे, हे तुम्हाला माहित आहे का? तर हे श्रेय जातं अभिनेता रितेश देशमुखला. निलेश साबळेने हा किस्सा सांगितला आहे.
भाडिपाच्या 'रेडी टू लीड' कार्यक्रमात सारंग साठ्येने निलेशला असा प्रश्न विचारला होता की हा शो सुरू करताना काही डोक्यात निश्चित होत का? शो चालू झाला तो नेमका कसा झाला? यावर निलेश म्हणाला की, 'माझ्या आयुष्यातील बऱ्याच गोष्ट अपघाताने घडला. त्यावेळी फू बाई फू शो पाच वर्ष चालला होता. त्यावेळी रितेश देशमुखांचा 'लय भारी' सिनेमा आला होता. त्यावेळी रितेशने झी वाहिनीकडे विचारणा केली होती की हिंदीप्रमाणे आपल्याकडे एक-दीड तास प्रमोशन करता येईल असा मोठा प्लॅटफॉर्म आहे का? असा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नव्हता. त्यावेळी मला झी मधून फोन आला की त्यांची अशी इच्छा आहे की असा एक एपिसोड करायचा आहे.
पुढे निलेश म्हणाला की, मी कधी एपिसोड करायचा आहे असं विचारल्यावर चॅनेलकडून परवा असे उत्तर आले. एक संपूर्ण शो जवळपास काही तासात उभा करणे सुरुवातीला कठीण वाटलं होतं. पण चॅनेलने 'लय भारी'च्या प्रमोशनसाठी निलेशवर विश्वास दाखवला होता. त्यावेळी या संधीचं सोनं करण्यासाठी त्याने हा शो करण्याचे ठरवले. आता चला हवा येऊ दे मध्ये काम करणाऱ्या सर्वांना निलेशने फोन केला, पण तेव्हा त्यांच्या डेट उपलब्ध नव्हत्या. केवळ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी होकार दिला. कुशल आणि भाऊ यांच्या घरी रात्री १०-११ वाजता गेलो. त्याच्याच मुलाच्या शाळेच्या वहीची पाने फाडली आहे त्यावर २-३ पानांची स्क्रीप्ट लिहिली. ज्या गोष्टी आम्ही मेकअप रुममध्ये बोलायचो त्यातून ही स्क्रीप्ट तयार झाली. त्यातून तीन तासाचे फुटेज तयार झाले म्हणून आम्ही दोन एपिसोड करायचे ठरवले. हे दोन्ही एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर त्याचे रेटिंग आले, चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यावेळी ठरले याचा आपण शो करायला हवा. अशाप्रकारे 'चला हवा येऊ द्या' हा शो सुरू झाला आणि गेल्या ८ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.