महिन्याला 200 रुपये कमावणारा तरुण झाला बॉलिवूडचा सुपरस्टार; आज एका सिनेमासाठी घेतो 5 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:55 AM2024-01-30T11:55:26+5:302024-01-30T11:55:48+5:30
Bollywood superstar: हा अभिनेता सुरुवातीच्या काळात गॅरेजमध्ये रहात होता.
आयुष्य जगत असताना स्ट्रगल कोणालाही चुकलेला नाही मग तो एक सर्वसामान्य व्यक्ती असो वा एखादा सेलिब्रिटी. कलाविश्वातही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रचंड हालाखीचे दिवस काढून इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये अशाच एका बॉलिवूड सुपरस्टारची चर्चा रंगली आहे. जवळपास ७४ हिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्याने एकेकाळी गॅरेजमध्ये राहून दिवस काढले आहेत.
सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती बॉलिवूडच्या हीमॅनची अर्थात अभिनेता धर्मेंद्र याची. शोले, आया सावन झुमके, अपने अशा जवळपास ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम करुन धर्मेंद्र यांनी स्वत:ला सिद्ध केलं. इतकंच नाही तर आज त्यांनी कलाविश्वापासून फारकत घेतली आहे. मात्र, तरी सुद्धा सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. सध्या त्यांचा स्ट्रगल काळ चर्चिला जात आहे.
धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. परंतु, या काळात त्यांच्याकडे रहाण्यासाठी घर सुद्धा नव्हतं. मुंबईत आलेल्या धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात अनेक वर्ष गॅरेजमध्ये राहून दिवस काढले. सोबतच मुंबईत उदरनिर्वाह करता यावा यासाठी ते एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम सुद्धा करायचे. त्यावेळी त्यांनी २०० रुपये महिन्याला पगार मिळत होता. सुपरस्टार सिंगर या रिअॅलिटी शोमध्ये अलिकडेच ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला.
"करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी एका गॅरेजमध्ये रहायचो. कारण, त्यावेळी मुंबईत माझं घर नव्हतं. मुंबईमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी मी एका ड्रिलिंग फर्ममध्ये काम करायचो. त्यावेळी मला २०० रुपये महिना पगार दिला जायचा. थोडे जास्त पैसे मिळावेत यासाठी मी ओव्हरटाइम सुद्धा करायचो", असं धर्मेंद्र म्हणाले.
१९६६ मध्ये आलेल्या 'फूल और पत्थर' या सिनेमामुळे त्यांचं नशीब पालटलं. ते रातोरात सुपरस्टार झाले. त्यानंतर त्यांनी 'शोले', 'चुपके चुपके', 'सीता और गीता', 'मेरा गांव मेरा देश', 'धरम वीर', 'फूल और पत्थर' आणि 'यमला पगला दीवाना' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
एका सिनेमासाठी चार्ज करतात ५ कोटी रुपये
रिपोर्टनुसार, आज धर्मेंद्र एका सिनेमासाठी ५ कोटी रुपये मानधन घेतात. त्यांची एकूण संपत्ती ४५० कोटी रुपये इतकी आहे. तर, लोणावळ्यामध्ये १०० एकर जागेत त्यांचा फार्महाऊस आहे. इतकंच नाही तर, ते शेती सुद्धा करतात. यातूनही ते उत्पन्न निर्माण करतात.