कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी या अभिनेत्रीनं काढून टाकले ब्रेस्ट, म्हणाली-"स्त्री म्हणून मला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 11:15 AM2024-07-05T11:15:13+5:302024-07-05T11:16:54+5:30
एक अभिनेत्री आहे, जिला स्तनाचा कर्करोग झाला नाही, पण होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत या अभिनेत्रीने शस्त्रक्रियेद्वारे तिचे स्तन काढून टाकले.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की ती ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आता ती रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हिनाच्या आधी अनेक अभिनेत्रींना ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास सहन करावा लागला आहे. पण एक अभिनेत्री अशी आहे जिने कॅन्सरच्या भीतीने आपले स्तन काढून टाकले होते.
होय, हे खरंय. अशी एक अभिनेत्री आहे जिला स्तनाचा कर्करोग झाला नाही, परंतु तो होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत या अभिनेत्रीला कोणताही धोका पत्करायचा नव्हता आणि तिने शस्त्रक्रियेद्वारे तिचे ब्रेस्ट काढून टाकले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री अँजेलिना जॉली (Angelina Jolie) आहे. अँजोलिना जॉलीनं जवळपास ११ वर्षांपूर्वी डबल मास्टेक्टॉमी ऑपरेशन केले होते. खरेतर तिच्या आईला युट्रेस कॅन्सर होता. ज्यामुळे २००७ मध्ये त्यांचं निधन झालं. डॉक्टरांनी अँजेलिनाला सांगितलं होतं की, जेनेटिक प्रॉब्लेममुळे तिला ब्रेस्ट कॅन्सर किंवा युट्रेसचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या मते, अँजेलिनाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के होती आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ५४ टक्के होती.
कर्करोग टाळण्यासाठी ऑपरेशन केले
अँजेलिना जॉलीने न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात या सर्व गोष्टींचा खुलासा केला होता. अँजेलिनाने लिहिले होते, 'जेव्हा मला माझे सत्य कळले तेव्हा मी सावध झाले आणि शक्यतो धोका टाळण्याचा प्रयत्न केला. मी ऑपरेशन करायचं ठरवलं. मी याची सुरुवात ब्रेस्टपासून केली कारण मला गर्भाशयाच्या कर्करोगापेक्षा स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त होता.
ब्रेस्ट काढून टाकल्यामुळे कर्करोगाचा धोका ५ टक्क्यांवर आला
अँजेलिनाने सांगितले की, ब्रेस्ट रिमूव्हलमुळे तिचा कॅन्सरचा धोका फक्त ५ टक्के राहिला. कर्करोगामुळे आई गमावलेली ही अभिनेत्री म्हणते, 'आता मी माझ्या मुलांना सांगू शकते की त्यांना स्तनाच्या कर्करोगामुळे आईला गमावण्याची भीती नाही. आता त्यांना अस्वस्थ वाटेल असे काहीही बघायला मिळणार नाही. ते फक्त माझ्या छोट्या जखमा आणि किरकोळ खुणा पाहू शकतात बाकी काही नाही.
'माझ्या स्त्रीत्वावर कोणताही परिणाम झाला नाही'
अँजेलिना जोलीने पुढे लिहिले की, मला आशा आहे की इतर महिलांना माझ्या अनुभवाचा फायदा होईल. कर्करोग हा शब्द अजूनही लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी पुरेसा आहे. ब्रेस्ट रिमूव्हलबद्दल अँजेलिना म्हणते, मला स्त्रीपेक्षा कमी वाटत नाही. याचा माझ्या स्त्रीत्वावर परिणाम झालेला नाही. मास्टेक्टॉमी करणाऱ्या महिला शस्त्रक्रियेद्वारे त्यांचे हरवलेले सौंदर्य परत मिळवू शकतात. परंतु ज्या महिला आजारी नाहीत त्यांना असा निर्णय घेणे कठीण आहे.