'वो' वुमनियाँ...!
By Admin | Published: July 6, 2016 02:18 AM2016-07-06T02:18:10+5:302016-07-06T02:18:10+5:30
छोट्या पडद्यावर असे काही मोजके कलाकार आहेत जे आडवाटेवर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही जगतातील काही पुरुष कलाकार सध्या स्त्रीपात्र साकारतायत
छोट्या पडद्यावर असे काही मोजके कलाकार आहेत जे आडवाटेवर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही जगतातील काही पुरुष कलाकार सध्या स्त्रीपात्र साकारतायत, हे प्रयत्नही अशाच वेगळ्या वाटेवरचे आहेत. पुरुष असताना एखाद्या महिलेचं पात्र साकारणं, महिलेसारखं वागणं, हावभाव, कपडे परिधान करणं सारं काही आव्हानात्मक आहे. अशा वुमनिया लूकमध्ये रसिकांचं मनोरंजन करणारे हे पुरुष कलाकार कोण आहेत ते पाहूया....
अली असगर
कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून अभिनेता अली असगरचं वेगळं रूप रसिकांना अनुभवयाला मिळालं. या शोमध्ये अली दादीच्या भूमिकेत अवतरला. त्यानं साकारलेली दादी रसिकांच्या मनात घर करून गेली. दादीची धम्माल मस्ती अलीनं मोठ्या खुबीनं साकारली. त्यामुळं द कपिल शर्मा शोमध्येही अलीचा दादी अवतार पुन्हा रसिकांना पाहायला मिळतोय.
सुनील ग्रोव्हर
छोट्या पडद्यावर अल्पावधीतच सुपरडुपर हिट ठरलेलं स्त्री पात्र म्हणजे गुत्थी. सुनील ग्रोव्हरनं गुत्थी या व्यक्तिरेखेला नवं परिमाण मिळवून दिलं. पुरुष असूनही गुत्थी साकारताना कोणतीही अश्लीलता वाटणार नाही याची काळजी घेत सुनील ग्रोव्हरनं हे पात्र साकारलं. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये गुत्थीच्या नाना तऱ्हा रसिकांना चांगल्याच भावल्या. दरम्यानच्या काळात कपिलसोबत झालेल्या वादामुळं सुनील ग्रोव्हरनं शोमधून एक्झिट घेतली. मात्र रसिकांवर गुत्थीची जादू अशी काही झाली होती की सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये गुत्थी बनून अवतरला. आता नव्याने सुरू झालेल्या द कपिल शर्मा शोमध्येही सुनील ग्रोव्हर रिंकू देवी हे स्त्री पात्र साकारताना पाहायला मिळतोय..
किकू शारदा
कॉमेडी नाइट्स विथ कपिल शोमध्ये स्त्री पात्र साकारणारा आणखी एक पुरुष कलाकार म्हणजे अभिनेता किकू शारदा. किकूनं या शोमध्ये साकारलेली पलक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलीय. किकूचा अभिनय आणि कॉमेडी यामुळं पलक हे पात्र अल्पावधीत घरोघरी पोहोचलंय. द कपिल शर्मा शोमध्येही किकू स्त्री पात्र साकारताना पाहायला मिळतोय. कधी नर्सच्या भूमिकेत तर कधी अन्य महिला पात्र तो साकारतोय.
विश्वजीत प्रधान
अभिनेता विश्वजीत प्रधानला खलनायक साकारणं काही नवं नाही. मात्र एक बूँद इश्क या मालिकेत विश्वजीतनं महिला पात्राची आव्हानात्मक भूमिका साकारली. कलावती नावाची भूमिका विश्वजीतनं मोठ्या खुबीनं साकारली. दुष्ट आणि वाईट प्रवृतीच्या कलावतीच्या भूमिकेला त्यानं न्याय दिला.
कृष्णा अभिषेक
कॉमेडीयन कृष्णा अभिषेकनं विविध रंगी भूमिका साकारून रसिकांचं मनोरंजन करण्याचा कायम प्रयत्न केलाय. प्रत्येक भूमिकेत काही ना काही वेगळं करून रसिकांना त्यानं हसवलंय. त्यामुळंच की काय कॉमेडी शोमध्ये तो कधी कधी महिला पात्र साकारतानाही पाहायला मिळाला.
गौरव गेरा
गौरव गेरानं जस्सी जैसी कोई नही या मालिकेत धम्माकेदार एंट्री केली होती, मात्र तो साऱ्यांच्या लक्षात राहिला चुटकी बनत 'चुटकी एंड द शॉपकिपर' या वेब सीरिजमुळे. याआधी गौरवनं 'मिसेज पम्मी प्यारेलाल'मध्ये स्त्रीभूमिकाच केली होती.