बदलत्या नात्यांची त्रिस्तरीय कहाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2015 01:23 AM2015-10-17T01:23:28+5:302015-10-17T01:23:28+5:30

कुटुंब, नाती, परिवारातले सदस्य, त्यांच्यातले भावनिक बंध या सगळ्यात ‘बदल’ हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे बदलणाऱ्या पिढीनुसार या बदलाचे स्वरूपही बदलत जाते.

Three-tier story of changing ties! | बदलत्या नात्यांची त्रिस्तरीय कहाणी!

बदलत्या नात्यांची त्रिस्तरीय कहाणी!

googlenewsNext

कुटुंब, नाती, परिवारातले सदस्य, त्यांच्यातले भावनिक बंध या सगळ्यात ‘बदल’ हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे बदलणाऱ्या पिढीनुसार या बदलाचे स्वरूपही बदलत जाते. मोठ्या कुटुंबात अधल्या-मधल्या पिढीची होणारी गोची किंवा घुसमट आणि त्यातून नाइलाजाने स्वीकारावी लागणारी त्यातली अपरिहार्यता हे या पिढीचे प्राक्तन आहे. प्रेमाची गुंतवणूक की स्वातंत्र्याचे खुले अवकाश; आणि या दोहोंत नाती टिकवण्यासाठी होणारी कुटुंबाची तगमग या साऱ्या भावभावनांचे प्रकटीकरण ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाने केले आहे.
पुण्यात स्थायिक असलेले राजवाडे हे उद्योजक कुटुंब आहे आणि त्यांचा व्यवसाय अफाट पसरलेला आहे. या भल्यामोठ्या अशा सुखवस्तू आणि श्रीमंत कुटुंबात तीन पिढ्या वावरत आहेत. पुण्यातला वाडा सोडून हे कुटुंब दुसऱ्या मोठ्या जागेत शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहे. ती जागा तयार होण्याच्या मधल्या काळात हे कुटुंब एका ठिकाणी वास्तव्याला आले आहे. या कुटुंबात पहिल्या पिढीचे प्रतिनिधी असलेले रमेश राजवाडे हे ‘कुटुंबप्रमुख’ ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांची पत्नी सुशीला, त्यांचे दोन मुलगे विद्याधर व शुभंकर, विद्याधरची पत्नी, मुले; तसेच रमेश राजवाडे यांची विवाहित मुलगी लक्ष्मी व तिचा घरजावई असलेला नवरा, तिची मुले असे हे बरेच विस्तारलेले कुटुंब आहे. हे कुटुंब कायम एकत्र राहावे, असा रमेश राजवाडेंचा अट्टाहास आहे. त्यांचा अजून एक मुलगा विक्रम हा घर सोडून गेलेला आहे. वाड्यातले देव हलवताना विक्रम बऱ्याच वर्षांनंतर अचानक तिथे अवतरतो. या घटनेने राजवाडेंच्या कुटुंबात चलबिचल होते. मात्र विक्रमचे आणि राजवाड्यांच्या तिसऱ्या पिढीचे सूत मस्त जुळते. विक्रमच्या एन्ट्रीने राजवाड्यांच्या तिसऱ्या पिढीत बदलाचे वारे वाहू लागतात. पण या सगळ्यात गोची असते ती मधल्या पिढीची! पहिल्या पिढीला नकार देण्यास कचरणाऱ्या मधल्या पिढीला नव्या पिढीपुढे मान तुकवावी लागते. दोन दगडांवर पाय ठेवल्यासारखी त्यांची स्थिती होते.
आतापर्यंत कौटुंबिक विषयावर अनेक कलाकृती आल्या असल्या, तरी या चित्रपटाची चव त्यांच्याहून बऱ्यापैकी वेगळी आहे. या चित्रपटाचा लेखक व दिग्दर्शक सचिन कुंडलकर याने या चित्रपटासाठी एक कौटुंबिक कॅनव्हास तर घेतला आहेच; पण त्यासाठी त्याने हाताशी तयार असलेल्या रंगांचे लेपन करण्याऐवजी त्या रंगांचे मिश्रण करून हे चित्र रेखाटले आहे. कथेतला बदल त्याने चित्रपट बनवण्याच्या कृतीतही उतरवला असल्याने वेगळ्या चवीचा चित्रपट निर्माण होण्यास मुदलातच सोय झाली आहे. मात्र हा चित्रपट अतिश्रीमंत अशा कुटुंबाचा परीघ चितारत असल्याने सामान्य माणसाशी किंवा सामान्य व्यक्तीच्या विचारांशी तो फारकत घेतो. सुखदु:खाची भावना गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नसली, तरी प्रत्येकाचा त्याकडे पाहण्याचाच नव्हे; तर ती अनुभवण्याकडे असलेल्या दृष्टिकोनात प्रचंड फरक असतो. यावर हा चित्रपट अडखळतो आणि सामान्यजनांशी तो थेट रिलेट होताना दोन पावले मागे येतो. पूर्णत: शहरी आणि श्रीमंत बाज या चित्रपटाने पकडला आहे.
सचिन कुंडलकर यानेच चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केले आहे आणि ते दमदार आहे. नात्यांचे वीणकाम करताना चांगल्या पटकथेची जोड चित्रपटाला मिळाली आहे; आणि चटपटीत संवादांनी चित्रपटाच्या मांडणीत उत्तम भर घातली आहे.

Web Title: Three-tier story of changing ties!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.