Throwback : अपुन भी स्टार बन गया भिडू..., ‘त्या’ दिवशी पहिल्यांदा जॅकी श्रॉफला हे फिलिंग आलं....!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 08:00 AM2022-10-02T08:00:00+5:302022-10-02T08:00:01+5:30
Jackie Shroff : बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात एक-दोन नाही तर अनेक मोठ्या स्टार्सचा बोलबाला होता. याच काळात मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. याच सुपरस्टारचा एक किस्सा...
बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात एक-दोन नाही तर अनेक मोठ्या स्टार्सचा बोलबाला होता. याच काळात मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. स्वत:च्या करिअरलाच नाही तर भारतीय सिनेमालाही त्याने एक नव्या उंचीवर नेलं. मुंबईच्या चाळीतला हा छोकरा कोण तर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ). जॅकी श्रॉफने देव आनंद यांच्या 1982 मध्ये प्रदर्शित ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला खरी ओळख दिली ती सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने. या एका चित्रपटाने जॅकी दादा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला. याच सुपरस्टारचा एक किस्सा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
साल 1984... ‘हिरो’ प्रदर्शित होऊन दीड वर्षाचा काळ लोटला होता. ‘हिरो’नंतर जॅकी स्टार बनला होता. त्याच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या. अर्थात सुपरस्टार झाला तरी जॅकीच्या डोक्यात हवा गेली नव्हती. आपण सुपरस्टार वगैरे झालोत, हे कधी त्याने मनावरच घेतलं नव्हतं. तसाही जॅकी बिनधास्त, चाळीत वाढलेला. त्यामुळे अपुन तो स्टार बन गया, असं काहीही त्याच्याबद्दल झालं नव्हतं. पण एका प्रसंगानंतर मात्र त्याला याचा अचानक साक्षात्कार झाला. त्यादिवशी पहिल्यांदा, ‘साला अपुन भी स्टार बन गया’ ही फिलिंग त्याच्या मनात आली.
काय होता तो प्रसंग? तर जॅकी एका सिनेमाच्या शूटींगसाठी चेन्नईत गेला होता. चेन्नईतल्या एका बड्या हॉटेलात त्याचा मुक्काम होता. योगायोग म्हणा वा आणखी काही पण याच हॉटेलात अमिताभ बच्चन देखील थांबले होते. अमिताभ ‘इन्कलाब’च्या शूटींगसाठी चेन्नईत आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं.
तर त्या दिवशी जॅकी शूटींगवरून परत आल्यावर हॉटेलच्या रूमवर लोळत पडला होता. अचानक त्याच्या दरवाज्यावर थाप पडली. त्याने दार उघडलं तर दोन चिमुकली मुलं समोर होती. अंकल, ऑटोग्राफ प्लीज, असं म्हणत त्या चिमुरड्यांनी कागद आणि पेन समोर केला. जॅकी ते पाहून उडालाच. होय, कारण या दोन चिमुरड्यांचे फोटो त्याने अनेक मासिकांमध्ये बघितले होते. जॅकीनं त्यांना प्रेमाने ऑटोग्राफ दिला. त्याक्षणी ‘अपुन भी स्टार बन गया भिडू,’असं त्याक्षणी जॅकीला पहिल्यांदा वाटलं. कारण ती दोन पोरं अमिताभ बच्चन यांची होती. दहा वर्षाची श्वेता बच्चन आणि 8 वर्षांचा अभिषेक बच्चन.
अमिताभ बच्चन सारख्या सुपरस्टारची मुलं आपला ऑटोग्राफ घेण्यासाठी येतात, ही भावना जॅकीला सुखावणारी होती. 2016 मध्ये ‘हाऊसफुल 3’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान जॅकीने खुद्द हा किस्सा सांगितला होता.