समीक्षकांनी ठेंगा दाखवूनही ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचला हा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:14 PM2018-11-09T14:14:06+5:302018-11-09T14:17:35+5:30
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा पहिल्याच दिवशी पन्नास कोटींचा बिझनेस करू शकेल असे व्यापार विश्लेषकांनी म्हटले होते. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२.२५ करोड रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आजवरच्या सगळ्या चित्रपटांचा पहिल्या दिवसाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे.
आमिरच्या खानच्या दंगल या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९.७८ कोटी रुपये कमावले होते. पण हा चित्रपट केवळ ५३०० स्क्रिन्समध्ये प्रदर्शित झाला होता तर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट ७००० स्क्रिन्समध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आमिरने स्वतःच्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. आजवर सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो या चित्रपटाने ३९.३२ आणि बाहुबली- द कन्क्ल्युजन या चित्रपटाने ४०.७३ कोटी इतका गल्ला पहिल्या दिवशी कमावला आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा ऐकून आमिर खान प्रचंड खूश झाला आहे. त्याने सांगितले आहे की, माझ्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा आकडा मला नुकताच कळला. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो.
ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य असून या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच आमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या चित्रपटातील लोकेशन देखील प्रेक्षकांना भावत आहेत.