"काहीही झालं तरी टायगर श्रॉफच्या "रॅम्बो" चित्रपटात काम करणार नाही"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 10:30 AM2017-07-18T10:30:24+5:302017-07-18T10:45:05+5:30
हिंदीमध्ये रिमेक करण्यात येत असलेल्या "रॅम्बो" चित्रपटात मी कोणत्याही परिस्थितीत काम करणार नाही आहे असं सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी स्पष्ट केलं आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - हिंदीमध्ये रिमेक करण्यात येत असलेल्या "रॅम्बो" चित्रपटात मी कोणत्याही परिस्थितीत काम करणार नाही आहे असं सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिल्व्हस्टर स्टेलॉन हिंदी रॅम्बो चित्रपटात झळकणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याच पार्श्वभुमीवर सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी या निव्वळ अफवा असून आपण अशी कोणतीच कमिटमेंट केलं नसल्याचं सांगितलं आहे. हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट "रॅम्बो"चा रिमेक करण्यात येणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारत आहे.
हॉलिवूडच्या उत्कृष्ट अॅक्शन चित्रपटांमध्ये सामील असलेल्या "रॅम्बो" चित्रपटातील मुख्य पात्र सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी साकारलं होतं. या चित्रपटाचे सिक्वेलही आले. "रॅम्बो" चित्रपटाचा मुख्य भाग होते सिल्व्हस्टर स्टेलॉन. एकट्याच्या खांद्यावर त्यांनी चित्रपट यशस्वी केला होता. बॉलिवूडने या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक करण्याचं ठरवलं आहे. टायगर श्रॉफ यावेळी सिल्व्हस्टर स्टेलॉन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टायगरला शुभेच्छाही दिल्या होत्या.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सिल्व्हस्टर स्टेलॉन हिंदी रॅम्बो चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. यावर सिल्व्हस्टर स्टेलॉन यांच्या प्रतिनिधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. "टायगर श्रॉफच्या रॅम्बो चित्रपटाशी काही घेणं देणं नाही, कोणत्याही परिस्थितीत त्यात सहभागी होत नाही आहे" असं सिल्व्हस्टर स्टेलॉनकडून सांगण्यात आलं आहे. चित्रपटाचा रिमेक करण्यालाही सिल्व्हस्टर स्टेलॉन यांचा काहीच विरोध नसून त्यांनी इन्स्टाग्रामवर शुभेच्छाही दिल्या होत्या. हा चित्रपट त्यांनी स्वत:च्या खांद्यावर उचलावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
अनेकांनी टायगर श्रॉफला मुख्य भूमिकेत घेण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ह्रतिक रोशन आणि सिद्धार्थ मल्होत्रासारखे अभिनेते रेसमध्ये असताना टायगर श्रॉफची निवड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. एम. कॅपिटल वेंचर, ओरिजिनल एंटरटेनमेंट, इम्पॅक्ट फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंद पिक्चर्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची अपेक्षा आहे.