Birthday Special : आधी ब्रेकअप, मग लग्न... अशी आहे टीना व अनिल अंबानींची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 08:00 AM2020-02-11T08:00:00+5:302020-02-11T08:00:08+5:30
आज टीना यांचा वाढदिवस.
टीना मुनीम या नावाने एकेकाळी सिनेप्रेमींना वेड लावले होते. आज टीना मुनीम टीना अंबानी नावाने ओळखल्या जातात. 1975 साली टीना यांनी फेमिना टीन प्रिन्सेस इंडियाचा किताब जिंकला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या बॉलिवूडमध्ये आल्या. 1978 साली देव आनंद यांच्या ‘देश परदेस’ मधून त्यांचा डेब्यू झाला. यानंतर देव आनंद यांच्यासोबत लुटमार आणि मनपसंद असे सिनेमे त्यांनी केले.
1981 टीना मुनीम व संजय दत्त यांचा ‘रॉकी’ रिलीज झाला. ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर संजय व टीना यांच्यात प्रेम फुलले. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. पुढे राजेश खन्नासोबतही टीना यांचे नाव जोडले गेले.
यानंतर टीना मुनीम यांच्या आयुष्यात अनिल अंबानींची एन्ट्री झाली. आज टीना यांचा वाढदिवस. त्यानिमित्त टीना व अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....
टीना व अनिल अंबानी यांची लव्हस्टोरी कोणत्या परिकथेपेक्षा कमी नाही. दोन अनोळखी व्यक्तीची भेट, मग प्रेम, मग घरच्यांचा विरोध अशा अनेक चढऊतारानंतर दोघांचे प्रेम लग्नाच्या मुक्कामापर्यंत पोहोचले.
एका लग्नात अनिल अंबानींनी टीना मुनीम यांना पहिल्यांदा पाहिले होते. टीना यांना पाहताच अनिल त्यांच्यात हरवून गेले होते. अनिल यांना टीना यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण अंबानी कुटुंबाचा या लग्नाला प्रखर विरोध होता. अभिनेत्रीसोबत लग्न हे अंबानी कुटुंबाला मान्य नव्हते. कुटुंबाच्या मर्जीपुढे अनिल अंबानींचे काहीही चालले नाही. साहजिकच यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
पण 1989 साली अमेरिकेत भूकंप आला आणि या भूकंपाने टीना व अनिल यांना पुन्हा एकत्र आणले. होय, अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये मोठा भूकंप आला होता. यादरम्यान टीनाही अमेरिकेत होत्या. अनिल यांना हे कळताच ते चिंतातूर झालेत. त्यांनी कसाबसा टीना यांचा नंबर मिळवला आणि त्यांची विचारपूस केली. या फोननंतर टीना व अनिल अंबानी यांच्यात नव्याने प्रेमाची पालवी फुटली. आता मात्र दोघांच्या पे्रमापुढे अंबानी कुटुंबाचा विरोध गळून पडला. कुटुंबाने दोघांच्या लग्नासाठी संमती दिली आणि 1991 साली टीना मुनीम टीना अंबानी झाल्यात.
लग्नाआधी टीना यांनी सुमारे 35 सिनेमांत काम केले. पण लग्नानंतर त्यांनी बॉलिवूड व ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम ठोकला. पती अनिल यांनी आजपर्यंत कधीही कुठल्याही गोष्टीसाठी टीना यांना नाही म्हटलेले नाही. टीना अनेक मुलाखतीत ही गोष्ट सांगतात. टीना व अनिल यांना जय अनमोल व जय अंशुल अशी दोन मुले आहेत.