‘अगं बाई अरेच्चा २’ आजपासून
By Admin | Published: May 22, 2015 12:05 AM2015-05-22T00:05:51+5:302015-05-22T00:05:51+5:30
एक वेगळीच कथा, थेट हृदयाला भिडणारे संगीत आणि अप्रतिम नृत्याविष्कार असणारा अनोखा विनोदी चित्रपट ‘अगं बाई अरेच्चा २’ शुक्रवारपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
पुणे : एक वेगळीच कथा, थेट हृदयाला भिडणारे संगीत आणि अप्रतिम नृत्याविष्कार असणारा अनोखा विनोदी चित्रपट ‘अगं बाई अरेच्चा २’ शुक्रवारपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
भारतात सिनेमा म्हटला की, प्रेमकहाणी आणि त्याला धरून गाणी ही असलीच पाहिजेत, हे समीकरण सगळ्याच चित्रपटांमध्ये दिसते. मात्र ‘अगं बाई अरेच्चा २’ची ही प्रेमकहाणी ‘स्पर्श’ या भावनेभोवती गुंफलेली आहे. तरी तिच्यात आपलेपणाचा, मनांनी-मनांशी केलेला ‘स्पर्श’ दिसतो.
स्पर्शाविना डुलणाऱ्या प्रेमकहाणीतील गंमत आणि हळुवारपणा या कथेतून व संगीतातून मांडला आहे. या अनोख्या अशा वैविध्यपूर्ण कथेत विनोद, प्रेम, विरह अशा विविध भावनांचा समावेश आहे. या प्रत्येकाला न्याय देणारे संगीत रसिकांना मोहून टाकणारे आहे.
चित्रपटाची कथा ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर व दिग्दर्शक केदार शिंदे यांची आहे. प्रमुख भूमिकेत सोनाली कुलकर्णी असून धरम गोहिल, मिलिंदङ्खफाटक, माधव देवचक्के, सुरभी हांडे, नम्या सक्सेना, उमा सरदेशमुख, विद्या पटवर्धन, वरुण उपाध्ये, शिवराज वायचळ, गौरवी जोशी, राजेश भोसले, राजेश सिंंग आदी कलाकार आहेत. त्याचप्रमाणे भरत जाधव, प्रसाद ओक व सिद्धार्थ जाधव यांच्या
विशेष भूमिका आहेत. इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत व अनुष्का मोशन पिक्चर्स अॅँड एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन निर्मित ‘अगं बाई अरेच्चा २’ या चित्रपटाचे नरेंद्र फिरोदिया, सुनील लुल्ला निर्माते व बेला शिंंदे सहनिर्मात्या आहेत. रत्नकांत जगताप हे कार्यकारी निर्माते आहेत. (प्रतिनिधी)
१केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाने अकरा वर्षांपूर्वी धूम केली. मराठी चित्रपटसृष्टीत ‘बिग सिनेमा’ काय असतो याचे उदाहरण या चित्रपटाने घालून दिले. चित्रपटाचे हे शीर्षक एवढे लोकप्रिय होईल याची त्या वेळी कल्पनाही नव्हती. परंतु चित्रपटाची कथा ऐकल्यावर सहजच कोणाच्याही तोंडून ‘अगं बाई... अरेच्चा..!!’ असे उद्गार बाहेर पडतात.
२हीच संकल्पना उचलून हा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. ही एक ‘सेन्सीबल कॉमेडी’ असल्याने आपल्या पाच ‘सेन्सेसवर’ (पंचेंद्रियांवर) आधारलेले पुढचे भाग असावे असा विचार घेऊनच या चित्रपटाची कथा निवडण्यात आली आहे. पहिला भाग ऐकू येणे यावर आधारलेला होता, तर दुसरा भाग स्पर्श या जाणिवेवर आधारलेला आहे.