मराठी मनावर राज्य करणा-या बालगंधर्वांचा आज जन्मदिवस

By Admin | Published: June 26, 2017 10:48 AM2017-06-26T10:48:30+5:302017-06-26T10:48:30+5:30

नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात.

Today's Birthday Balgandharvancha that ruled the Marathi mind | मराठी मनावर राज्य करणा-या बालगंधर्वांचा आज जन्मदिवस

मराठी मनावर राज्य करणा-या बालगंधर्वांचा आज जन्मदिवस

googlenewsNext

tyle="text-align: justify;"> 
(२६ जून १८८८-१५ जुलै १९६७)
आपले गायन व अभिनय यांच्या साहाय्याने मराठी रंगभूमी व नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे युगनिर्माते!  नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात. अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांनी महाराष्ट्राच्या दैवतांची नावे घेताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर बालगंधर्वांचीही गणना केली आहे. ही तीन नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. पु.ल. देशपांडे म्हणतात, ‘‘बालगंधर्व या नावाचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं, तरी क्षणार्धातच जादूचं झाड फुलून यावं, तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं, त्याला मराठी मन म्हणायला हरकत नाही.बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं.’’
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी जन्मलेल्या बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. नाटकांतील नेपथ्य-सजावट, नाट्यसंगीत, नाट्याभिनय या क्षेत्रांत मनापासून उपासना करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका म्हणजे साक्षात ‘कायाप्रवेशच’. त्यांच्या नजरेत, मुद्रेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, कपडे नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला आहे  असे वाटत असे. ‘पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल,’ असे आचार्य अत्रे यांनी बालगंधर्वांबाबत म्हटले आहे.
मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न बालगंधर्वांच्या रूपाने सत्यात आले. सहजसुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. बालगंधर्वांना सुंदर, मोहक आणि बोलका चेहरा लाभला होता. गोड गळ्याची देणगीही त्यांना जन्मजात लाभली होती. शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व  सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.
१९१३ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २-३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.
१९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बोलपटात त्यांचे मन रमेना. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका  साकारल्या. पण त्यांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. ह्या रसिकप्रिय कलावंताचा संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. पुढे त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविलेगेले. त्याआधी १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे.
 
सौजन्य : महाराष्ट्राचे शिल्पकार पुस्तक
संकलन : प्रफुल्ल गायकवाड

Web Title: Today's Birthday Balgandharvancha that ruled the Marathi mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.