बॉलिवूडवर आता टॉलिवूड फिव्हर!, साऊथमधील हा प्रसिद्ध अभिनेता तापसी पन्नूसोबत शेअर करणार स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:19 PM2022-11-17T16:19:09+5:302022-11-17T16:19:49+5:30
साऊथ सिनेइंडस्ट्री आणि साऊथ सुपरस्टार्सची बॉलिवूडप्रेमींमध्ये सध्या क्रेझ पाहायला मिळत आहे.
अलीकडच्या काळात साऊथ सिनेइंडस्ट्री आणि साऊथ सुपरस्टार्ससाठी बॉलिवूडप्रेमींच्या मनात स्थान निर्माण झालं आहे. 'बाहुबली' चित्रपटामुळे साऊथ चित्रपटांबाबत बॉलिवूडप्रेमींमध्ये क्रेझ वाढली आहे, असे अनेकांचे मत आहे. 'पुष्पा', 'RRR' आणि 'KGF 2' सारखे चित्रपट दीर्घ लॉकडाऊननंतर प्रदर्शित झाले आणि हिंदी बॉक्स ऑफिसवर दक्षिणेतील कलाकार भारी पडली. बॉलिवूड कलाकारांकडे पाठ फिरवून लोकांनी अल्लू अर्जुन, यश आणि राम चरण यांसारख्या साऊथ स्टार्सना डोक्यावर घेतले. दरम्यान आता साउथचा आणखी एक स्टार बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. हा अभिनेता म्हणजे 1992 साली ‘रोजा’ आणि 1995 साली ‘बॉम्बे’ या सिनेमात झळकलेला अरविंद स्वामी. अभिनेता अरविंद स्वामी अभिनेत्री तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद स्वामी सुनीर खेतेरपालच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात ते दोघे बापलेकीच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय लालवानी करत आहे. विजय लालवानीने यापूर्वी फरहान अख्तर आणि दीपिका पादुकोणचा कार्तिक कॉलिंग कार्तिक या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तब्बल 12 वर्षानंतर तो पुन्हा एकदा सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. शेवटचे त्याने झी 5 वरील द फायनल कॉल या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अरविंद स्वामी आणि तापसी पन्नूच्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरे शेड्युल पार पडले असून तिसऱ्या शेड्युलला लवकरच सुरूवात होणार आहे.
2005 साली अरविंद स्वामीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. यातून बरे होण्यासाठी अरविंदला 4-5 वर्षांचा कालावधी लागला. यादरम्यान तो सिनेइंडस्ट्रीपासून दुरावला होता. पण मणिरत्नम यांनी ‘कडाल’ या तमीळ चित्रपटासाठी अरविंदला साईन केलं. त्यानंतर अरविंद अनेक सिनेमांत झळकला. मागील वर्षी कंगना राणौतच्या थलायवी या सिनेमात अरविंदने एम जी रामचंद्रन यांची भूमिका साकारली होती.