समीक्षकांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या 'दिठी'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:51 PM2021-05-13T18:51:31+5:302021-05-13T18:52:17+5:30
'दिठी' चित्रपटात एका साध्या लोहाराची कथा रेखाटण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'दिठी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात एका साध्या लोहाराची कथा रेखाटण्यात आला आहे. त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या वेदना, त्याचे दु:ख आणि अद्वैतवादाचा सिद्धांत अनुभवण्याच्या त्याच्या प्रवासाची ही गोष्ट यात दाखवण्यात आला आहे. ‘दिठी’ चित्रपट २१ मे रोजी सोनी लिव ओरिजनल्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुमित्रा भावे यांना ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ११ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४५ हून अधिक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या असंख्य कथा, पटकथा, गीते, त्यांचे कला दिग्दर्शन, वेशभुषा आणि दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी मानांकित करण्यात आले आहे. चित्रपटात अनेक नावाजलेल्या कलाकारांची वर्णी लागली आहे. अभिनेता किशोर कदम, डॉ.मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर,कैलाश वाघमारे,अमृता सुभाष,गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांनी आपली भूमिकेमध्ये जीव ओतला असून प्रत्येकाने आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्मात्या,दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले असून या चित्रपटामुळे त्यांच्या आठवणींवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जाईल.
प्रसिद्ध मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या कथेवर आधारित चित्रपट आहे. रामजी (किशोर कदम) यांच्या आयुष्यातील दुःखद घटनेवर पुस्तकात लिखाण करण्यात आले आहे. ‘दिठी’ मराठी चित्रपट २१ मे रोजी सोनी लिव ओरिजनल्सवर प्रदर्शित होणार आहे.