‘शॉर्ट फिल्म’चा ट्रेंड
By Admin | Published: September 15, 2016 02:05 AM2016-09-15T02:05:39+5:302016-09-15T02:05:39+5:30
हल्ली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच माहितीप्रधान चित्रपट बघायला अधिक आवडत असल्याने अडीच ते तीन तासांचा चित्रपट बनविण्यापेक्षा दहा ते तीस मिनिटांची शॉर्ट फिल्म बनविण्याकडे बॉलीवूड
हल्ली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच माहितीप्रधान चित्रपट बघायला अधिक आवडत असल्याने अडीच ते तीन तासांचा चित्रपट बनविण्यापेक्षा दहा ते तीस मिनिटांची शॉर्ट फिल्म बनविण्याकडे बॉलीवूड निर्मात्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. प्रबोधनात्मक संदेश देणारे व वास्तविकतेवर आधारित असलेले हे चित्रपट केवळ प्रेक्षकांनाच भावत नसून, अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारांची लयलूट करीत आहेत. वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्याची इच्छा ठेवणारे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना या फॉरमॅटमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याने सध्या बॉलीवूडमधील अनेक नामांकित चित्रपट निर्मात्यांनी शॉर्ट फिल्म्स फॉरमॅटकडे लक्ष केंद्रित केले आहे. अनुराग कश्यप, अनुराग बसू, अक्षत वर्मा, शिरीष कुंदर आदी निर्मात्यांनी विविध विषयांवर आधारित शॉर्ट फिल्म्स बनवून सध्या धूम उडवून दिली आहे.
राधिकाची ‘अहल्या’
सुजॉय घोष यांची ‘अहल्या’ ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक ठरली. फिल्ममध्ये राधिका आपटे हिची मुख्य भूमिका आहे. कोलकाताच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही १४ मिनिटांची फिल्म एक अप्सरा, एक महर्षी आणि इंद्रदेव यांच्या कथेवर आधारित आहे. अप्सरेच्या भूमिकेत राधिका आपटे असून, तिला शापित दाखविण्यात आले आहे. त्यामुळे फिल्म बघताना हा हॉररपट असल्याचा भास होतो.
अनुरागची ‘शॉटर््स’
एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करणारे अनुराग कश्यप यांनी शॉटर््स फिल्ममध्येदेखील नशीब अजमावले आहे. त्याच्या ‘शॉटर््स’ नावाच्या फिल्मने इंडस्ट्रीत चर्चा घडवून आणली होती. या फिल्ममध्येच ‘सुजाता, एपिलॉग, आॅडॅसिटी, मेहफूज आणि शोर’ नावाच्या छोट्या-छोट्या फिल्म आहेत. या पाचही फिल्म्सचे प्रेक्षक तसेच टीकाकारांनी कौतुक केले. हे पाचही चित्रपट विविध विषयांवर आधारित आहेत. शिवाय याचे दिग्दर्शन नव्या दमाच्या तरुणांनी केले आहे. एका कॉन्टेस्टच्या माध्यमातून अनुरागने या सर्व तरुणांची निवड केली होती.
‘क्रिती’चा रेकॉर्ड
शिरीष कुंदर यांची ‘क्रिती’ ही शॉर्ट फिल्म सध्या यू-ट्युबवर अक्षरश: धूम करीत आहे. आतापर्यंत यू-ट्युबवर ही फिल्म एक कोटीपेक्षा अधिक प्रेक्षकांनी बघितली आहे. या फिल्मचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ दोनच दिवसांत ही संपूर्ण फिल्म शूट करण्यात आली आहे. शिवाय यासाठी कलाकारांनी कुठल्याही प्रकारचे मानधन घेतले नाही. मनोज वाजपेयी, राधिका आपटे, नेहा शर्मा यांची यात प्रमुख भूमिका आहे. ही फिल्म ‘बीओबी’ची कॉपी असल्याचा आरोप एका नेपाळी निर्मात्याने केला होता. याबाबत कायदेशीर खटलादेखील दाखल करण्यात आला होता. शिरीष कुंदर यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर ही फिल्म २२ जून रोजी आॅनलाइन रीलीज करण्यात आली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मैदानात उतरले होते.
स्टंट वूमनवरही फिल्म
‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील दीपिका पदुकोण किंवा ‘सिंंघम’मधील करीना कपूर यांनी केलेल्या स्टंटमागचा चेहरा असलेल्या गीता टंडन हिच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट फिल्म बनविण्यात आली आहे. ‘गीता’ नावाच्या या फिल्ममध्ये तिची डॅशिंग लाइफ दाखविण्यात आली आहे. मोठमोठ्या इमारतींवरून उड्या मारणे किंवा आगीतून दुचाकी पळवितानाचे स्टंट करताना तिची काय मानसिकता असते याबाबतची अतिशय इमोशनल फिल्म तिच्यावर चित्रित करण्यात आली आहे. तसेच दोन मुलांच्या पालनपोषणासाठी तिला कराव्या लागत असलेल्या विविध पातळ्यांवरील संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
आधुनिक महाभारत ‘ममाज् बॉय’
सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली शॉर्ट फिल्म म्हणजे अक्षत वर्मा यांची ‘ममाज बॉय’ होय. महाभारतासारखा विषय मॉडर्न अंदाजात मांडून या शॉर्ट फिल्मने सध्या धूम उडवून दिली आहे. ‘डेली बेली’, ‘एक मै और एक तू’सारखे चित्रपट बनविणाऱ्या अक्षत वर्मा यांनी पांडव आणि द्रौपदीचे वैवाहिक जीवन २०१६ मध्ये कशा पद्धतीचे असेल हे या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात द्रौपदीची भूमिका आदिती राव हैदरी हिने साकारली आहे. तर कुंतीच्या भूमिकेत नीना गुप्ता आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये महाभारतातील तो प्रसंग चित्रित करण्यात आला आहे, ज्यामध्ये द्रौपदीचे स्वयंवर दाखविण्यात आले आहे. चित्रपट हा कॉमेडी धाटणीचा असल्याने निश्चित वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सुनिधीची शॉर्ट फिल्ममधून अभिनयात एंट्री
गायिका सुनिधी चौहान हिने शॉर्ट फिल्ममधून अभिनयात एंट्री केली आहे. ‘प्लेइंग प्रिया’ या फिल्ममध्ये सुनिधीने भूमिका साकारली आहे. या फिल्मचे दिग्दर्शन आरिफ अली यांनी केले आहे. ही फिल्म घरगुती हिंसाचारावर आधारित आहे. कुटुंबातील सदस्यांना बळी पडलेली महिला जेव्हा काही तरी नवीन करण्याचा विचार करते तेव्हा तिला येत असलेले अडथळे यात दाखविण्यात आले आहेत. फिल्ममध्ये अनेक टिष्ट्वस्ट आहेत.
भारतातील पहिली मोबाइल शॉर्ट फिल्म
सोशल मीडियावर या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे हिचेदेखील शॉर्ट फिल्मवरील प्रेम कधी लपून राहिले नाही. तिची ‘द वीकेण्ड’ ही फिल्म लवकरच आॅनलाइन रीलीज केली जाणार असून, सध्या पूनम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पूनमचा हा चित्रपट मोबाइल यूजर्ससाठी असून, भारतातील पहिली मोबाइल फिल्म म्हणून याकडे बघितले जात आहे. या फिल्ममध्ये पूनम हॉट अंदाजात बघावयास मिळेल. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने अद्यापपर्यंत या चित्रपटाला कुठल्याही दर्जाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. मात्र या फिल्मचा ट्रेलर आॅनलाइन लिक झाला आहे.