ट्रँगल लव्हस्टोरीज्चा परफेक्ट अँगल
By Admin | Published: March 27, 2016 02:16 AM2016-03-27T02:16:15+5:302016-03-27T02:16:15+5:30
लव्हस्टोरी म्हटले की डोळ्यांसमोर आपसुकच समुद्रकिनारी रोमँटिक गाणे गाणारा हीरो... त्याच्या गाण्यावर लाजणारी हीरोईन... असे दृश्य तरळून जाते; पण सगळ्याच प्रेमकथा
लव्हस्टोरी म्हटले की डोळ्यांसमोर आपसुकच समुद्रकिनारी रोमँटिक गाणे गाणारा हीरो... त्याच्या गाण्यावर लाजणारी हीरोईन... असे दृश्य तरळून जाते; पण सगळ्याच प्रेमकथा काही एवढ्या साध्या सोप्या नसतात; अन् सगळंच हॅप्पी-हॅप्पी असेल ती प्रेमकथाच कसली. दोघीत तिसरा किंवा दोघांत तिसरी आल्याशिवाय त्या प्रेमकहाणीला रंग चढत नाही हेच खरं. तिच्यावर जीव तोडून प्रेम करणारा तो अन् त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती; अन् त्याच्यासाठी आतल्याआत मनात झुरणारी दुसरीच कोणीतरी... असे झाले की, समजा त्या लव्हस्टोरीमध्ये ट्रँगल झाला; आणि मग काय त्या सिनेमाला आपोआपच परफेक्ट अँगल मिळाला. आता अशा प्रकारचे अनेक हिंदी-मराठी सिनेमे आले, ज्यामध्ये ट्रँगल लव्हस्टोरीज् दाखविल्या गेल्या. हा विषय तरुणांच्या इमोशन्सशी अगदी मॅच होत असल्याने प्रत्येक जण त्यात आपलीच कहाणी शोधत असतो. मग काय, अशा ट्रँगल लव्हस्टोरीज्ला यूथच्या लाइक्स मिळून त्या सुपरहिट होतात. अशाच काही हिट ट्रँगल लव्हस्टोरीज्चा ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा.
दुनियादारी
दोस्तोंकी दुनियादारी आणि सच्चा मित्रांची कहाणी दाखविणारा ‘दुनियादारी’ हा सिनेमा कट्ट्यावरच्या प्रत्येक मित्रालाच आपलासा वाटतो; पण या ‘दुनियादारी’मध्येदेखील मैत्रीपलीकडे जाऊन प्रेमाचे हळुवार नाते उलगडलेच आहे. शिरीनसाठी पागल असलेला श्रेयस लपूनछपून तिच्यावर प्रेम करतो. मित्राच्या सांगण्यावरून मिनूसाठी प्रेमाचे खोटे नाटक करतो. त्या नाटकामध्ये हरवलेली मिनू नकळतपणे श्रेयसच्या प्रेमात पडते अन् सुरू होते यांच्या प्रेमकहाणीची खरी कहाणी. श्रेयस-शिरीन-मिनू हा लव्ह ट्रँगल ‘दुनियादारी’मध्ये एवढ्या रिअॅलिस्टीक पद्धतीने दाखविला आहे की, काही क्षणांसाठी डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही; अन् म्हणूनच ‘दुनियादारी’तील ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना अपील झाली.
क्लासमेट
मैत्रीची पुढची स्टेप म्हणजे प्रेम असे म्हणतात खरे; पण ‘क्लासमेट’ या सिनेमामध्येदेखील आपल्याला हेच पाहायला मिळते. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी अन् सोनाली कुलकर्णी यांच्यातील ट्रँगल या सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे. कॉलेजमध्ये टवाळक्या, टुकारगिरी करणाऱ्या सत्याचा ग्रुप अन् त्याची एकदम खास मैत्रीण अप्पू जी कधीच मुलींसारखी नसते, तर एकदम डॅशिंग, मारामारी करणारी अन् रांगड्या लूकमध्ये सतत वावरणारी अशी बिनधास्त मुलगी असते. अचानक सत्याच्या आयुष्यात आदिती येते अन् मग अप्पूला सत्याविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव होते. ही भावस्पर्शी कहाणी पाहताना मन भरून आल्याशिवाय राहत नाही. असे सत्या-अप्पू-आदिती आजही कोणत्या ना कोणत्या कॉलेज कट्ट्यावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील.
तु हि रे
लग्नाआधीची प्रेयसी लग्नानंतर जर एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा आली, तर त्याच्या संसाराची फरफट झाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक प्रेमकहाणी पाहायला मिळते ‘तु हि रे’मध्ये सिद्धार्थ, नंदिनी अन् भैरवीची. कॉलेजमध्ये फुललेले सिद्धार्थ-भैरवीचे प्रेम केवळ भैरवीच्या वडिलांमुळे कोमेजून जाते आणि मग सिद्धार्थ मुवआॅन होऊन गावातील नंदिनीशी लग्न करतो. लग्नानंतर नव्याने नंदिनीच्या प्रेमात पडलेला सिद्धार्थ तिच्यात पूर्णपणे गुंतून जातो. बायको अन् मुलगी या परफेक्ट फॅमिली पिच्चरमध्ये मग एन्ट्री होते भैरवीची अन् सुरूहोतो नंदिनी-सिद्धार्थ-भैरवीचा ट्रँगल. या प्रेमकहाणीमध्ये शेवटी जिंकते ती नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी नंदिनी.
मितवा
नात्याला काही नाव नसावे ‘तु हि रे माझा मितवा...’ असे गाणे जरी असले, तरी अवनी अन् शिवम्च्या मैत्रीच्या नात्याला प्रेमाचा स्पर्श होतोच; आणि सुरूहोते कहाणी लव्ह ट्रँगलची. अल्लड, बेफिकीर, लाइफ एकदम स्वत:च्याच मनाप्रमाणे जगणारा शिवम् अन् त्याची केअर करणारी अवनी दोघेही एकमेकांचे खूपच क्लोज फें्रड्स असतात. अवनी कुठेतरी शिवम्च्या नकळतपणे प्रेमात असते; पण कधी त्याला सांगत नाही. मग एन्ट्री होते नंदिनीची. तिला पाहताच शिवम् तिच्या प्रेमात पडतो अन् मग या प्रेमकहाणीत अवनीलाच तिच्या प्रेमाचा त्याग करावा लागतो.
प्रत्येक प्रेमकथेला एक बाज असतो. प्रत्येक प्रेमकहाणी ही वेगळीच असते. लव्हस्टोरीज्मध्ये जेव्हा कॉम्प्लिकेशन्स येतात, तेव्हा समजायचे की त्यामध्ये ट्रँगल आला. ट्रँगल हा फक्त मुलगा किंवा मुलीचा नसतो, तर ज्या वेळी प्रेमकथेत तिसरा घटक येतो, तो ट्रँगल असतो. ‘मैने प्यार किया’मध्येदेखील ट्रँगल होता; आणि तो म्हणजे त्यांचे वडील. याचाच अर्थ प्रेमात येणारा प्रत्येक अडथळाच ट्रँगल असतो.
- स्वप्निल
जोशी