सत्यघटनेवर आधारित 'नजर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:01 PM2018-07-11T15:01:14+5:302018-07-11T15:04:03+5:30
एक नवी मालिका ‘स्टार प्लस’वर लवकरच सुरू होत असून तिचे नाव ‘नजर’ असे आहे. या मालिकेची कथा सत्यघटनांवर आधारित आहे.
छोट्या पडद्यावर अमानवी शक्तींच्या विषयावरील मालिकांना मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो आणि अशा मालिका लवकर लोकप्रिय होतात. अर्थात त्यामागे संबंधित मालिकेच्या विषयासाठी केलेल्या संशोधनाचा वाटा बराच मोठा असतो. अशीच एक नवी मालिका ‘स्टार प्लस’वर लवकरच सुरू होत असून तिचे नाव ‘नजर’ असे आहे. या मालिकेची कथा सत्यघटनांवर आधारित आहे.
या मालिकेतील प्रसंग व घटना या प्रत्यक्ष जीवनात घडलेल्या घटनांवर आधारित असल्याच्या आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी निर्मात्यांनी एक खास गटाची स्थापना केली असून हा गट अशा घटनांचा मागोवा घेत राहणार आहे. या गटाने अलीकडेच झारखंड राज्यातील काही ठिकाणांना भेट दिली आणि तिथे ‘दिसलेल्या’ काही अमानवी शक्तींची माहिती जमविली.
निर्मितीशी निकटचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, ‘डायन’ म्हटले जाते ती निव्वळ चेटकीण नसून ती त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची शक्ती आहे. डायन या शब्दाला एक कलंक लागला असून आम्हाला कोणत्याही साचेबध्द संकल्पनेत अडकायचं नव्हतं. अशा मालिकांसाठी एका पूर्ण संशोधन टीमची गरज असून तिने या संकल्पना योग्य दृष्टिकोनातून मांडण्याची गरज असते. आम्ही झारखंडमधील काही स्थळांना भेटी दिल्या आणि जिथे जिथे अशा शक्तींचा दृष्य परिणाम दिसल्याचे सांगितले गेले, तिथल्या गोष्टींचा आम्ही तपशीलवार अभ्यास केला. यासारख्या मानवी शक्ती या केवळ लोककथा आणि दंतकथांचा भाग नसून आधुनिक काळातही त्या अस्तित्त्वात आहेत, ही गोष्ट आम्हाला प्रकाशात आणायची होती. या मालिकेतून आम्ही अनेक प्रकारची आजवर अज्ञात असलेली माहिती प्रेक्षकांपुढे सादर करणार असून ती ऐकताना आणि तिचा अनुभव घेताना प्रेक्षकांना थरारक अनुभव येईल.”
‘फोर लायन्स फिल्म्स’ने निर्मिती केलेल्या या मालिकेमागील संकल्पना गुल खान यांची असून त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांना ‘इश्कबाझ’ आणि ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ यासारख्या अतिशय लोकप्रिय मालिका दिल्या आहेत.