Exclusive:"हो, मी राजकारणात जाणार..." 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली घोषणा
By शर्वरी जोशी | Published: November 8, 2021 11:50 AM2021-11-08T11:50:40+5:302021-11-08T11:54:12+5:30
Trupti desai: घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा समाजकार्याकडे वळवला आहे. लवकरच त्या 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' हे नवं आंदोलन छेडणार आहे. परंतु, या घरातून बाहेर पडल्यानंतर लवकरच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिल्या जाणाऱ्या बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) घरातून तृप्ती देसाई (trupti desai) बाहेर पडल्या आहेत. मात्र, या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा समाजकार्याकडे वळवला आहे. लवकरच त्या 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' हे नवं आंदोलन छेडणार आहे. त्यापूर्वीच त्या घरातून बाहेर पडल्यानंतर लवकरच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याचं दिसून येत आहे. याविषयी त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली असून राजकारणातील प्रवेशाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
"समाजकार्य करणं हे पहिलं उद्दिष्ट्य आहे. परंतु, त्याचसोबत गोरगरीबांसाठी काही करावं ही इच्छा आहे. यासाठी एखाद्या पक्षामध्ये योग्य पद मिळालं तर नक्कीच राजकारणात जाईन", असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात त्या एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"बिग बॉसच्या घरात जो ५० दिवसांचा प्रवास होता तो अविस्मरणीय होता. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मी सांगितलं होतं की जिंकूनच येणार. आणि, त्याप्रमाणे मी लोकांची मनं जिंकली. पूर्वी माझं खूप ट्रोलिंग व्हायचं. लोक मला फक्त आंदोलनात भांडण करताना किंवा वाद घालताना पाहात होते. परंतु, बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना समजलं," असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
राजकारणात प्रवेशाविषयी काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
"मी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्य करत आहे. परंतु, राजकारणात येण्याच्या हेतूने हे काम कधीच केलं नाही. मात्र, अनेकदा गोरगरीबांची काम तातडीने मार्गी लागावीत यासाठी माझ्याकडे एखादं पद असणं गरजेचं आहे, असं अनेकांकडून मला सांगण्यात आलं. म्हणूनच, गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."
कोणत्या पक्षात जाणार तृप्ती देसाई?
"कोणत्या पक्षात जायचं हे अद्याप ठरवलं नाही. परंतु, जर मला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर नक्कीच मी पुढे राजकारणात जाण्याचा विचार करेन. तसंच ज्या पक्षात जाईन तिथे गेल्यावर संधीचं सोनं करेन हे नक्की."
दरम्यान, तृप्ती देसाई हे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. नुकत्याच त्या बिग बॉस मराठी सिजन ३ मधून बाहेर पडल्या आहेत.