‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील बरकतची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईकच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:46 AM2019-04-18T11:46:01+5:302019-04-18T11:53:03+5:30
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत असून या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या व्यक्तिरेखा तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्त्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम मिळत आहे.
या मालिकेतील बरकत हा राणादाचा जिवलग मित्र असून ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत बरकतची भूमिका अभिनेता अमोल नाईक साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमुळे अमोलला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. अमोलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमोलचे नुकतेच लग्न झाले असून त्याच्या लग्नाचे फोटो या मालिकेत अंजलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
अमोलने पूजा नावाच्या तरुणीसोबत लग्न केले असून त्याच्या लग्नाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेची सगळीच टीम उपस्थित होती. अक्षयाने शेअर केलेल्या या फोटोंवरून या सगळ्यांनी त्याच्या लग्नात खूप धमाल मस्ती केली हे लक्षात येत आहे. या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होते. हा अमोलदेखील मुळचा कोल्हापूरचा आहे. तेथील कसबा वाड्यात तो राहात असून त्याचे शिक्षणही तिथेच झाले आहे. रंगमंचावर अनेक वर्षं अभिनय केल्यानंतर अमोलला ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.