Top 5 Marathi Serials : टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:18 PM2019-10-03T17:18:37+5:302019-10-03T17:19:28+5:30
Famous Serials In Marathi : येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम पाचव्या नंबरवर असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम पाचव्या नंबरवर असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तुझ्यात जीव रंगला ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या रिपोर्टनुसार गेल्या काही आठवड्यांपासून तुझ्यात जीव रंगला ही मालिकाच पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेत राणाची झालेली एक्झिट आणि त्यानंतर हार्दिक जोशीची राजा राजगोंडा म्हणून झालेली एंट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे असेच म्हणावे लागेल. कारण कथानकाला मिळालेल्या या ट्विस्टपासूनच या मालिकेची लोकप्रियता अधिक वाढली आहे.
अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या रिपोर्टमध्ये पूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता या मालिकेला चांगलेच मागे टाकले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील आणि खानावळीची मालकीण सुमी यांच्या मैत्रीने सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. ही मालिका आता टिआरपी रेसमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका पाचव्या क्रमांकावर होती.