लैंगिक शोषणाचा आरोप असलेले TVF सीईओ अरुणाभ कुमारचा राजीनामा
By Admin | Published: June 16, 2017 05:34 PM2017-06-16T17:34:59+5:302017-06-16T17:34:59+5:30
एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीव्हर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांनी राजीनामा दिला आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीव्हर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी मेंटर म्हणून मी उपलब्ध असेन असं अरुणाभ कुमार यांनी सांगितलं आहे. अरुणाभ कुमार यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण 2016 मधील असून पीडित तरुणी मुलाखतीसाठी गेली असता अरुणाभ कुमार यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे अशी माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र कोणाच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे हे पोलिसांनी उघड केलेलं नव्हतं.
TVF CEO Arunabh Kumar steps down from his position after facing sexual harassment charges, says will be available as a mentor (File Pic) pic.twitter.com/O5d2wXKUUO— ANI (@ANI_news) June 16, 2017
अरुणाभ कुमार यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी TVF ची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने ब्लॉगच्या माध्यमातून अरुणाभ कुमार यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. 2014 ते 2016 दरम्यान TVF मध्ये काम करत असताना आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
TVF ने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसंच खोटे आरोप करणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांना सोडणार नाही असं म्हटलं होतं. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अरुणाभ यांनी त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच याप्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती.