तारीख अन् वेळ ठरली! 'स्टार प्रवाह'ची 'उदे गं अंबे' ही नवीन मालिका 'या' दिवशी होणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:55 AM2024-09-12T11:55:06+5:302024-09-12T11:55:56+5:30
'उदे गं अंबे' या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
Star Pravah New Serial Ude Ga Ambe : स्टार प्रवाहवर सप्टेंबर महिन्यात एक नवीन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा दमदार पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेची घोषणा झाल्यापासून 'उदे गं अंबे' ही नेमकी कधी आणि कोणत्या वेळेला प्रसारित केली जाणार, याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता होती. अखेर या मालिकेच्या शुभारंभाची तारीख व वेळ याची अधिकृतपणे 'स्टार प्रवाह'च्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. याबरोबर मालिकेचा जबरदस्त प्रोमो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे.
'उदे गं अंबे' या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही नवी मालिका ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित करणार असल्याचं स्टार प्रवाह वाहिनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे झळकणार आहे. तर भगवान शिवशंकरच्या भूमिकेत देवदत्त नागे (Devdatta Nage) पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे देवदत्त नागे या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर 'स्टार प्रवाह'च्या मालिकेत झळकणार आहे. 'देवयानी' या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता तो पुन्हा एकदा 'स्टार प्रवाह'बरोबर जोडला जातोय. सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही.