पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'श्यामची आई'; चित्रपटाला लाभला अशोक पत्कींच्या संगीताचा साज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:33 PM2022-07-06T19:33:05+5:302022-07-06T19:34:47+5:30
Ashok patki: या चित्रपटासाठी अशोक पक्ती यांनी संगीत द्यावं अशी चित्रपटाच्या टीमची इच्छा होती. त्यानुसार, या चित्रपटातील तीन गाण्यांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून 'श्यामची आई' या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. 'श्यामची आई'चा उल्लेख होताच सर्वप्रथम आठवतात ते साने गुरूजी. त्यासोबतच मनात रुंजी घालू लागतात साने गुरुजींच्या लेखणीतून अवतरलेली अजरामर गाणी. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यानंतर आजच्या रंगीबेरंगी युगात पुन्हा एकदा त्याच काळात नेणारा 'श्यामची आई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या गीताचा साज चढणार आहे.
सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचं चित्रीकरण पार पडलं आहे. त्यानंतर ईता पन्हाळ्यामध्ये दुसरं शेड्युल पार पडत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अशोक पक्ती यांनी संगीत द्यावं अशी चित्रपटाच्या टीमची इच्छा होती. त्यानुसार, या चित्रपटातील तीन गाण्यांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे.
'श्यामची आई' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन आहे. साने गुरुजींच्या विचारांचं द्योतक असणाऱ्या या चित्रपटातील गाणीही अतिशय अर्थपूर्ण आहेत. त्यातील भाव ओळखून तो संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संगीतकार या नात्यानं माझ्यावर आहे, असं अशोक पत्की म्हणाले.