माधुरी या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली सोनाली कुलकर्णीची स्टायलिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:01 PM2018-10-29T13:01:39+5:302018-10-30T06:30:00+5:30
नुकतेच ‘माधुरी’ या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोनाली कुलकर्णीचा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘माधुरी’. या चित्रपटातून सोनाली कोणती भूमिका साकारणार आहे, कथा काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटात सोनालीसह शरद केळकर आणि संहिता जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तर यांनी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे, जी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूक पाहायला मिळत आहे. ‘के सेरा’ हे गाणं प्रत्येकासाठी खास असेल. अर्थात, हे गाणं प्रत्येकासाठी खास बनवण्यामागे संगीत दिग्दर्शक, गायक-गायिका, गीतकार यांची मेहनत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षकांचे आवडते गायक स्वप्निल बांदोडकर, जान्हवी अरोरा आणि मुग्धा कऱ्हाडे या गाण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या सुमधूर, कमाल आवाजाने या गाण्याला रॉंकिंग बनवले. वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून रॉकस्टार अवधूत गुप्ते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. खरं तर, नेहमी प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन अवधूत गाणी बनवतो, त्यामुळे हे गाणं पण प्रेक्षकांच्या ‘कमाल’ प्रतिक्रिया मिळवणार हे नक्की.
जर गाणं रॉकिंग असेल तर ते गाणं खास जिच्यासाठी बनवलं आहे ती पण रॉकिंग दिसणं तितकंच महत्त्वाचं आहे ना. तर, ‘के सेरा’च्या गाण्यासाठी खास उर्मिला मातोंडकरने सोनाली कुलकर्णीची स्टायलिंग केली आहे. तसेच या गाण्याविषयी बोलताना उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे की, “जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की खरं तर हे गाणं प्रत्येक जनरेशनसाठी जणू आयुष्याचं अँथम आहे. वैभवने लिहिलेले शब्द ही सुंदर कविता आहे. अगदी साध्या-सोप्या भाषेत संपूर्ण आयुष्याचे सार आणि आयुष्य कसे जगावे हे सांगितले आहे. अवधूत गुप्तेने तर संगीत एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे, प्रत्येकजण या गाण्याशी जोडला जाईल असे संगीत अवधूतने दिले आहे. या दोघांनीही यासाठी विशेष काम केले आहे.”
या गाण्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे हे गाणं नक्की हिट होणार असा विश्वास चित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तरला आहे. मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हा चित्रपट येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.