स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 02:11 PM2019-07-10T14:11:11+5:302019-07-10T14:12:08+5:30
चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते.
चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. अलीकडे स्वरा अभिनेत्री शबाना आझमी यांच्या बचावार्थ मैदानात उतरली. साहजिकच ती पुन्हा ट्रोल झाली. पण यावेळी एका ट्रोलरचे ट्वीट स्वराच्या डोक्यात गेले आणि तिने थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.
या ट्वीटमध्ये संबंधित युजरने स्वराबद्दल असभ्य भाषा वापरली होती. स्वराने हे ट्वीट पाहिले आहे आणि लगेच त्याचा स्क्रिनशॉट मुंबई पोलिसांशी शेअर करत कारवाईची मागणी केली. या युजरने स्वरासाठी कॉल गर्ल, टुकडे टुकडे गँग असे असे आक्षेपार्ह शब्द वापरले होते.
In his own words ‘mad, proud and fortunate nationalist & Hindu’ bringing shame upon his (and my) religion and nation! Also I think this qualifies as harassment or Eve teasing or something @MumbaiPolice 🙏🏿🙏🏿🙏🏿 pic.twitter.com/iBzeNN2AEx
— Swara Bhasker (@ReallySwara) July 9, 2019
स्वराच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी लगेच दखल घेतली. ‘आम्ही तुला फॉलो करत आहोत. तू तुझा नंबर द्यावास आम्ही प्राधान्याने हे प्रकरण हाताळू, ’अशा शब्दांत मुंबई पोलिसांनी स्वराला आश्वस्त केले. मुंबई पोलिसांनी लगेच दखल घेतलेली पाहून स्वराने त्यांचे आभार मानलेत. तसेच त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचेही कौतुक केले.
🙏🏿🙏🏿🙏🏿 wow! Thank you for the prompt reply and kudos to @MumbaiPolice social media handle for being available 24/7 ! 🙌🏾🙌🏾🙌🏾🙌🏾 #Gratitudehttps://t.co/aCuZGXITg1
— Swara Bhasker (@ReallySwara) July 9, 2019
शबाना यांनी नुकतेच देशात घडणा-या घटनांवर भाष्य केले होते. ‘देशाच्या कामकाजात त्रुटी आढळून येत असतील, तर त्यावर खुलेपणाने चर्चा करणे हे तितकेच महत्वाचे आहे, कारण ते देशहितासाठी आहे. पण आज सरकारविरोधात बोलणा-याला थेट देशद्रोही ठरवले जाते, असे शबाना म्हणाल्या होत्या. यावरून शबाना ट्रोल झाल्या होत्या. यादरम्यान स्वरा भास्कर शबानांच्या बाजूने मैदानात उतरली होती. ‘जे लोक शबाना आझमी यांना भाजपाविरोधी ठरवत आहेत, ते कदाचित विसरलेत की, शबाना यांनी राजीव गांधी सरकारला फटकारत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल रोखून धरला होता,’असे ट्वीट स्वराने केले होते.