'तर मी त्यांचे फोडेन थोबाड..', घाटी म्हणणाऱ्यांना उषा नाडकर्णीने सुनावले खडेबोल
By तेजल गावडे | Published: September 29, 2020 12:38 PM2020-09-29T12:38:51+5:302020-09-29T12:39:50+5:30
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी कलाकारांना घाटी म्हणून संबोधणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून संबोधले जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठी कलाकारांना घाटी म्हणून संबोधणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या की, आजवर मला कधी कुणी घाटी म्हटलेले नाही. मात्र जर कोणी मला म्हणाले तर त्या माणसाचे मी थोबाड फोडेन.
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है अशा शब्दात हिणवलं जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उषा नाडकर्णी यांना असा अनुभव आला का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप तरी कुणीही आपल्याला असे म्हणालेले नाही. मराठी कलाकारांना पुरेसा आदर मिळतो मात्र आपल्याला कुणी असे म्हणाले तर मात्र मी त्या व्यक्तीचे थोबाड फोडेन. त्या शिवाय गुणवत्ता असूनही पैसे पुरेसे दिले जात नाहीत अशीही खंत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बोलून दाखवली.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत बोलताना त्यांनी दुःख व्यक्त केले. खूप चांगला मुलगा होता. त्याच्याबाबतीत जे काही घडले ते अस्वस्थ करणारे असून मनाला चटका लावणारेही आहे असेही त्या म्हणाल्या.