"माझ्या वडिलांना धमक्यांचे फोन आले अन्..."; वैदेही परशुरामीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 02:04 PM2024-03-17T14:04:08+5:302024-03-17T14:04:40+5:30
वैदेही परशुरामीने एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या बालपणीचा एक विशेष किस्सा सांगितला आहे. काय म्हणाली वैदेही?
अभिनेत्री वैदेही परशुरामी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. वैदेहीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'सिंबा', 'इंडियन पोलीस फोर्स' अशा कलाकृतींमधून वैदेहीने बॉलिवूडमध्येही स्वतःची छाप पाडली आहे. वैदेहीने 'वायफळ' या युट्यूबचॅनलला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या लहानपणीचा एका अनुभव शेअर केलाय.
वैदेहीचे बाबा वकील आहेत. त्यावेळी काही केसेसच्या वेळी तिच्या बाबांना कसे अनुभव आले हे सांगताना वैदेही म्हणाली, "माझ्या वडिलांनी जेव्हा प्रॅक्टीस सुरु केली तेव्हा सुदैवाने त्यांना खुप चांगले सिनीयर्स मिळाले. आपल्याला जे काम येतं, जी केस येते त्याचा परिणाम स्वतःवर होऊन द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं. आम्ही लहान असताना त्यांनी अशाही केस घेतल्या ज्यामुळे घरात अशांतता पसरली होती. एक - दोनदा असंही झालं की लँडलाईनवर धमक्यांचे फोन आले."
वैदेही पुढे म्हणाली, "तेव्हा आम्ही लहान होतो. आई अर्थात घाबरली होती. तेव्हा वडिलांनी ठरवलं की, हे घरापर्यंत येतंय. त्यामुळे अशा केसेस नाही घेतल्या तर आपल्या आयुष्यात असा काही फरक नाही पडणार आहे. त्यामुळे त्यांनी कामाच्या बाबतीत एक मर्यादा ठेवली." अशाप्रकारे वैदेहीने खुलासा केला. वैदेहीच्या करिअरमध्ये तिच्या बाबांनी तिला खुप प्रोत्साहन दिलं, असंही ती म्हणते.