७५ वर्षांचे असूनही फिट अँड फाइन कसे? नाना पाटेकर म्हणतात- "जीममध्ये जाता येत नसेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 02:06 PM2024-12-04T14:06:13+5:302024-12-04T14:07:06+5:30
नाना पाटेकरांनी ज्यांना जीममध्ये जाता येत नसेल त्यांच्यासाठी घरबसल्या करता येईल असा फिटनेस फंडा सांगितला आहे
नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. नाना पाटेकर यांना आपण विविध मराठी, हिंदी तसंच साऊथ सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. नाना यांच्या आगामी हिंदी सिनेमाची अर्थात 'वनवास'ची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात नानांसोबत उत्कर्ष शर्माही प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने नाना विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशातच बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत नानांनी त्यांचा फिटनेस फंडा सांगितला.
नाना पाटेकरांनी सांगितला फिटनेस फंडा
नाना पाटेकर ७५ वर्षांचे आहेत. तरीही या वयात त्यांचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. याबद्दल नाना पाटेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "शरीर हे माझं वेपन आहे. ते माझं शस्त्र आहे. ते जर नीट असेल तर... गाडी आपण कशी नीट ठेवतो पाणी वगैरे टाकून... व्यायाम करायचा असेल तर सर्व करायचा.. एरवी कुठेतरी व्यायामशाळांमध्ये जाणं शक्य नसेल तर बैठक आणि सूर्यनमस्कार हे एकदा तुम्ही केलेत ना की बास्स!"
स्वतःवर प्रेम करा: नाना पाटेकर
नाना पाटेकर पुढे म्हणतात, "मी आता ७५ चा आहे अजून दोन-चार जणांना घेऊ शकतो मी. मला त्याचं कौतुक वाटतं. अजूनही आरशासमोर स्वतःला बघायला आवडतं. आपल्याला आपण आवडलो ना तर जगण्याची गंमत काहीतरी वेगळी आहे. आपल्याला आपण आवडायला पाहिजे. मग हाही आवडेल, तोही आवडेल, सर्व आवडतील. आरशात बघताना स्वतःची किळस आली की जगण्याची गंमत संपते." नाना पाटेकरांचा अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास सिनेमा २० डिसेंबरला रिलीज होणार आहे.